नागपूर - शहाराकरीता आवश्यक लसी प्राप्त न झाल्याने सलग दुसऱ्या दिवशी ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण बंद पडलेले आहे, त्यामुळे या वयोगटातील नागरिकांमध्ये कमालीची नाराजी निर्माण होऊ लागली आहे. तर १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींसाठी शहरातील केवळ ६ ठिकाणीच लसीकरणाची व्यवस्था करण्यात आल्याने अनेकांना इच्छा असताना देखील लस मिळत नसल्याने त्यांच्यात देखील नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
लसीकरणाची मोहीम गेल्या काही दिवसांपासून फारच संथ गतीने सुरू आहे. आवश्यक प्रमाणात लस मिळत नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण जवळजवळ ठप्प पडले आहे. मध्येच एखाद्या दिवशी लसीकरण सुरू केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी लस उपलब्ध झालेल्या नसल्याचे कारण सांगून लसीकरण बंद असल्याचा फलक लावून प्रशासन मोकळं होत असल्याने आता नागरिकांचा संताप वाढायला लागला आहे. सलग दोन दिवसांपासून ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण ठप्प झाले असताना राज्य शासनाच्या निर्देशानुसार १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तिसाठी केवळ ६ केन्द्र शहरात सुरु करण्यात आली आहेत.
ऑनलाइन नोंदणी ठरते आहे डोकेदुखी -
१८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य असल्याचं महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ऑनलाईन नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून जी वेळ देण्यात आली आहे. त्याच वेळेत त्यांनी उपस्थित राहावे असे सांगितले जात आहे. तरी बहुतांश वेळी ऑनलाइन स्लॉट उपलब्ध होत नसल्याने ऑनलाइन नोंदणी पद्धत डोकेदुखी ठरत असल्याचे मत लस घेण्यासाठी इच्छुकांनी व्यक्त केलं आहे.
लस पुरवठा झाल्यास लसीकरण सुरू होईल -
४५ वर्षावरील वयोगटाचे सर्व नागरिकांचे लसीकरण शनिवारी होणार नाही. लशीचा पुरवठा न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. लशीचा मुबलक पुरवठा झाल्यानंतर पुन्हा लसीकरण सुरु करण्यात येईल, अशी माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
हेही वाचा - मुंबईसाठी थेट जागतिक बाजारपेठेतून करणार लसींची खरेदी - आदित्य ठाकरे