नागपूर - 'कोविड'वरील उपचारासाठी आवश्यक ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा पुरवठा नागपूर आणि महाराष्ट्रात वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मायलन'व्हिटारीस इंडीया'चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोंमजाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
नितीन गडकरी यांच्या विनंतीवरून 'मायलन इंडिया'ने तात्काळ चार हजार इंजेक्शन नागपूरला पोहोचते केले आहेत. लवकरच दुसरी खेप पाठवण्याचे आश्वासनही दिले आहे. मायलन इंडीया ही ‘रेडेसिवीर ‘ इंजेक्शन उत्पादन करणारी भारतातील सगळ्यात मोठी कंपनी आहे. यापूर्वी गडकरी यांनी ‘सन फार्मा'चे मालक सिंघवी यांच्याशी बोलणे केले होते. 'सन फार्मा'मार्फत गेल्या दोन दिवसात तीन हजार डोसचा पुरवठा नागपुरात झाला आहे. उर्वरित डोसेज लवकरच पोहोचवण्याची अपेक्षा आहे.
इंजेक्शनची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर -
नागपूर जिल्ह्यातील एकूण परिस्थिती बघता रॅमिडीसीविर इंजेक्शनच्या उपलब्धते संदर्भातील माहिती वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी नागपूर जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत वेबसाईट नागपूर डॉट जीओव्ही डॉट इन वर ही माहिती उपलब्ध केली जात आहे.