नागपूर - नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महानगरपालिका संचालित आयसोलेशन दवाखान्यातील कोविड सेंटरमध्ये काही गुंडांनी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली होती. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ पुढे आला असून त्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. बदल पसेरकर, रिक्की तोमास्कर, डेव्हिड आणि ललित अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
आरोपींकडून रुग्णालयाची तोडफोड -
पोलिसांच्या माहितीनुसार काल (रविवारी) संध्याकाळी बदल पसेरकर, रिक्की तोमास्कर, डेव्हिड आणि ललीत नावाचा गुंड आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यांच्यापैकी एकाला ईजा झाली होती. कोरोनामुळे आयसोलेशन रुग्णालयाला कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यात आल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना इतर दवाखान्यात जाण्यास सांगितले असता संतापलेल्या आरोपींनी रुग्णालयात तोडफोड करण्यास सुरुवात केली, त्यामुळे कोविड हॉस्पिटलचे कर्मचारी चांगलेच धास्तावले होते. या संदर्भात कर्मचाऱ्यांकडून इमामवाडा पोलिसांना सूचना देण्यात आली, काही वेळातच पोलिसांचे एक पथक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले तेव्हा दोन आरोपी पळून गेले तर दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहे.
संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद -
चार आरोपींनी आयसोलेशन दवाखान्याच्या कोविड वॉर्डमध्ये तोडफोड केल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यावेळी आरोपींनी कर्मचाऱ्यांना धमकवल्याचे देखील दिसून येत आहे.
हेही वाचा - मुंबापुरीला चक्रीवादळाचा तडाखा.. मुसळधार पावसाने मुंबई 'स्लो ट्रॅक'वर
हेही वाचा - दुचाकीच्या पेट्रोल टाकीत, सीटखाली दारू वाहतूक करणाऱ्याला बेड्या