नागपूर - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, बेजबाबदार लोक अजूनही ऐकत नसल्याचे चित्र आहे. यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिले आहेत. लोक ऐकत नसल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा असल्याचे ते म्हणाले.
सर्वात आधी लोकांनी लॉकडाऊनचा अर्थ समजून घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यामध्ये स्वतःला घरात सुरक्षित कैद करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुंडे यांनी शहरात फेरफटका मारून सर्व परिस्थितीचा अढावा घेतला.
लोकांनी या नियमाचे उल्लंघन केल्यास आम्हाला जबरदस्तीने त्यांना घरी बसवावे लागेल असे आयुक्त म्हणाले. कोणावरही जबरदस्ती करण्याची प्रशासनाची इच्छा नसून लोक ऐकत नसल्यास त्याचे परिणाम समाजाला भोगावे लागतील. त्यामुळे सर्वांनी सरकारच्या प्रयत्नांना साथ द्यावी, असे मत पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी व्यक्त केले आहे.