नागपूर - मेट्रोच्या रिच तीन टप्प्यातील सुभाषनगर-सीताबर्डी या स्थानकांदरम्यान मेट्रोचे पहिल्यांदा ट्रायल रन घेण्यात आले. या मार्गावर लवकरच प्रवासी वाहतूक सुरू करण्याचे लक्ष्य महा मेट्रोने निर्धारित केले आहे. या पार्श्वभूमीवर ही ट्रायल रन महत्वपूर्ण मानली जात आहे.
खापरी ते सीताबर्डीदरम्यान प्रवासी वाहतूक सुरू झाल्यावर या मार्गावर वाणिज्यिक सेवा कधी सुरू होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सुभाष नगर येथून ट्रायल रनला सुरवात झाली. मेट्रो ट्रेनच्या या ट्रायल रनदरम्यान महा मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुभाषनगर ते सिताबर्डी आणि नंतर इंस्टिट्यूट ऑफ इंजीनियर मेट्रो स्टेशनपर्यंत परत, असा मेट्रो ट्रायल रन यावेळी घेण्यात आला. हा प्रवास या भागातील रहिवासी तसेच रस्त्यावरून जाणाऱ्यांसाठीदेखील कुतूहल आणि उत्सुकतेचा विषय ठरला. ट्रायल रन झाल्याने लोकमान्य नगर ते सीताबर्डीदरम्यान प्रवासी वाहतूक केव्हा सुरू होते, याची प्रतीक्षा सर्व सामान्य नागपूरकरांना आहे.