नागपूर - शहरातील अवनी ज्वेलरी शॉपमध्ये पडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेचे थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यामध्ये चार दरोडेखोरांनी मिळून बंदुकीच्या धाकावर २२ लाखांचे दागिने आणि चार लाखांची रोकड लंपास केली होती. दुकान मालकाने जिवाच्या आकांताने स्वतःला वाचण्यासाठी केलेली धडपड देखील या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे. एकूणच अंगावर काटा येईल अशा प्रकारचे हे सर्व दृश्य आहे.
चार दिवसांपूर्वी नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भीम चौकातील अवनी ज्वेलर्स नामक एका सराफा दुकानात सशस्त्र दरोडा पडला होता. ज्यात चार दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर दुकान मालकाला जबर मारहाण करत २२ लाख रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने आणि चार लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. या प्रकरणातील दोन आरोपींना मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यामध्ये दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश केल्यानंतर कशाप्रकारे दुकान मालकाला बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केली, कशा पद्धतीने दुकानातील दागिने लुटले हे सर्व या सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. दरोडेखोरांच्या तावडीतून सुटण्यासाठी दुकान मालकाने केलेली धडपड देखील या सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. अंगावर काटा उभा राहिल असा हा सीसीटीव्ही आहे.
घटनाक्रम..
जरीपटका भागातील भीम चौक हा कायम वर्दळीचा भाग आहे. या ठिकाणी रविंद्र नावरे यांच्या मालकीचे अवनी ज्वेलर्स नामक सोने चांदीचे दागिने विक्रीचे दुकान आहे. ५ जुलै रोजी दुपारच्या सुमारास चार दरोडेखोरांनी एका मागे एक ग्राहक बनून प्रवेश केला. या चार पैकी एका दरोडेखोराजवळ बंदूक देखील होती. दुकानात प्रवेश करताच एका दरोडेखोराने दुकानाचे शटर आतून बंद केले तर एक दरोडेखोर हा दुकानाच्या बाहेर पाळत ठेऊन होता. दुकानाच्या आत असलेल्या दरोडेखोरांनी दुकान मालकाला बंदुकीच्या धाक दाखवत ओलीस धरले होते. दुकान मालक आरडाओरडा करत पळून जाण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता असल्याने त्यांनी रविंद्र नावरे यांचे हातपाय बांधून मारहाण केली. जिवाच्या भीतीने दुकान मालक रविंद्र नावरे यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. दरोडेखोरांनी गल्यात (काउंटर) मध्ये ठेवलेले चार लाख नगदी रुपायांसह दुकानातील २२ लाखांचे सोने चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला.
४०० तासांचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग तपासले -
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथक नागपूर बाहेर जाणाऱ्या मार्गांवर तैनात करण्यात आले होते. यामध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगढ, चंद्रपूर आणि वर्धा सह अमरावती मार्गांचा समावेश होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अवघ्या काही वेळात ८२ ठिकाणच्या सीसीटीव्हीमधील ४०० तासांची रेकॉर्डिंग तपासली होती.
मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने आरोपींना अटक..
आरोपी मध्यप्रदेश राज्यातील कटनी शहरा जवळ असलेल्या एका लॉजमध्ये थांबले होते. ते ठिकाण नागपूरवरुन सुमारे सहा तासाच्या अंतरावर असल्यामुळे नागपूर पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहचणे शक्य नव्हते. त्यामुळे तात्काळ मध्यप्रदेशच्या कटनी पोलिसांसोबत संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली. आणि आरोपी ज्या ठिकाणी थांबले होते. ते देखील ठिकाण कटनी पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर कटनी पोलिसांनी देखील तात्काळ कारवाई करत त्या लॉजवर छापा टाकला. तेव्हा आरोपी पोलिसांना बघताच पळाले. मात्र, पोलिसांनी त्यांचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून दोन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये दोन आरोपींची मोटारसायकल पोलिसांच्या वाहनाला धडकल्यामुळे एका आरोपीचा पाय फॅक्चर झाला तर दुसरा आरोपी जखमी झाला आहे. मात्र दुसऱ्या मोटारसायकलवर असलेले दोन आरोपी मोटारसायकल सोडून जंगलात पळून गेले आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. मध्यप्रदेश पोलिसांनी नगदीसह काही दागिने जप्त केले आहेत.