नागपूर - उपराजधानीत केवळ २४ तासात तिघांची हत्या झाल्याने पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. लॉकडाऊन दरम्यान नागपुरात थांबलेल्या गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. २४ तासात हत्येच्या तीन घटनांनी नागपूर पोलिसांची पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे.
पहिला घटना यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. कारागृहातुन नुकतीच सुटका झालेल्या एका गुन्हेगाराची तिघांनी मिळून हत्या केली आहे. अनुज बघेल ठाकूर असे मृताचे नाव आहे. १६ मे रोजी तो कारागृहातुन बाहेर आला होता. एका वर्षांपूर्वी मृतक अनुज याने मोहम्मद सलीम उर्फ मक्कान अन्सारी याची दुचाकी जाळली होती, त्या गुन्ह्यात अनुजला पोलिसांनी अटकदेखील केली होती. १६ मे रोजी त्याची कारागृहातुन सुटका झाली होती. काल रात्री मोहम्मद सलीम आणि अनुज यांचा आमना सामना झाला तेव्हा दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. आरोपी मोहम्मद सलीम याने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने अनुजचा खून केला आहे. अनुजच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
दुसरी घटना राणा प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपाल नगर बाजार पेठेत घडली आहे. कार्तिक साळवी नावाचा तरुण त्याच्या दुचाकीवरून जात असताना दुसऱ्या बाईकवर आलेल्या आरोपींनी कार्तिकवर लोखंडी रॉडने हल्ला करत भररस्त्यात त्याची हत्या केली. मृत कार्तिक केबल ऑपरेटर म्हणून काम करत होता. प्रेम प्रकरणातून त्याचा खून झाल्याचे सांगितले जात आहे. परिसरातील सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे.
तिसरी घटना- हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत घडली. वैभव मूर्ते असे मृत तरुणाचे नाव आहे. वैभवच्या खुनामागील कारण अद्याप पुढे आलेले नाही. त्यामुळे त्याचा खून कुणी केला हे देखील समजू शकलेले नाही.
लॉकडाऊन दरम्यान नागपुरातील गुन्हेगारी थोडी थंडावली होती. लॉक डाऊन शिथिल होताच आता गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या आठवडाभरात नागपूर शहरातच खुनाच्या सहा घटना घडल्या आहेत.