नागपूर - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी औषध आणि इंजेक्शनचा काळाबाजार असून थांबलेला नाही. टॉसीलीझुमॅब इंजेक्शन (TOCILIZUMAB) चा काळाबाजार करणाऱ्या होमिओपॅथीच्या दोन डॉक्टरांसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस उपायुक्त विनीता साहू यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ४० हजार किमतीचे टॉसीलीझुमॅब इंजेक्शन आरोपी १ लाख रुपयांमध्ये विकत असल्याच्या माहिती मिळताच पोलिसांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून सौदा पक्का केल्यानंतर आरोपींना अटक करण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. आरोपीने इंजेक्शनची विक्री करताच पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी मध्ये विशेष उर्फ सोनू बाकट, रामफल वैश्य या दोन होमिओपॅथी डॉक्टरांचा समावेश असून हे दोघेही मध्यप्रदेशच्या बालाघाट येथील रहिवासी आहेत तर सचिन गेवरीकर नामक तिसऱ्या आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त विनिता साहू यांना त्यांच्या गुप्त बातमीदराकडून सूचना मिळाली होती की रविनगर चौकातून लॉ कॉलेज चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर एका मेडीकलच्या समोर एक व्यक्ती टॉसीलीझुमॅब इंजेक्शन विकण्याच्या प्रयत्न करत आहे. त्याआधारे डीसीपी विनिता साहू यांनी लगेच आपल्या पथकाला कारवाई करण्याची सूचना केली. पोलिसांनी एका डमी ग्राहकाला पाठवून माहितीची सत्यता पटवली असता ती खरी निघताच पोलिसांनी डमी ग्राहकाला सौदा पक्का करण्याचे आदेश दिला. त्यानंतर आरोपींनी ४० हजार किंमत असलेले इंजेक्शन १ लाख रुपायांमध्ये विकण्यास तयारी दर्शवल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीकडून एक लाख रुपयांमध्ये इंजेक्शनची खरेदी केली. इंजेक्श खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण होताच पोलिसांनी सचिन अशोक गेवरीकर नामक आरोपीला ताब्यात घेऊन त्याची पचासमक्ष झडती घेतली असता आरोपी सचिन जवळ Actemra कंपनीचे टॉसीलीझुमॅब इंजेक्शन आढळून आले.
होमिओपॅथी डॉक्टरांना अटक -
आरोपी सचिन गेवरीकर याने इंजेक्शन कुठून मिळाले या संदर्भात पोलिसांनी चौकशी केली असता बी. एच.एम.एस. डॉक्टर विशेष उर्फ सोनू जीवनलाल बाकट आणि डॉ रामफल लोलर वैश्य या दोन बी.एच.एम.एस. डॉक्टरांनी नाव पुढे आली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून त्याच्या जवळून इंजेक्शन, एक पल्सर गाडी व तीन मोबाईल असा एकूण १ लाख ६५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.