नागपूर - शहरात ज्येष्ठ नागरिकांना 1 मार्चपासून 11 शासकीय केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यात वाढता शासकीय यंत्रणेवरील ताण आणि ज्येष्ठ नागरिकांची गर्दी पाहता खासगी रुग्णालयांना लसीकरणाच्या मोहिमेची तयारी झाली आहे. बहुतांश ठिकाणी लसीकरणासाठी नावनोंदणी प्रक्रिया राबवण्यात आली आहे. शुक्रवारपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे.
शासकीय रुग्णालयात गर्दी वाढली
नागपुरात 11 शासकीय केंद्रांत तीन दिवसात जवळपास 3 हजार ज्येष्ठ आणि इतर आजार असणाऱ्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. पण शासकीय रुग्णालयात गर्दी वाढलेली आहे. सामाजिक अंतर ठेवण्यासह अनेक अडचणींना समोर जावे लागत आहे. यासाठी खासगी रुग्णालयांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे बाकी
विभागीय आयुक्तांच्या आदेशाने शहरातही शासकीय 11 केंद्र आणि आता खासगी 17 केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच त्यांना लसीचे डोसेजसुद्धा देण्यात आले आहेत. यासह 40 रुग्णालयांची यादी तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये शासनाच्या आरोग्यविषयक विविध उपचाराची सोय उपलब्ध केली जाणार आहे. त्यानंतर या रुग्णालयातसुद्धा लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेत निवड करण्यात आलेली अनेक रुग्णालये ही कोविड रुग्णालये होती. यामुळे या रुग्णालयातील रुग्णांना सुट्टी देऊन तेथे लसीकरणाच्या मोहिमेची सुरुवात होणार आहे. तसेच या संदर्भात काही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणेसुद्धा बाकी आहे. गुरुवारी काही रुग्णालयात लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात होऊ शकली नाही. पण शुक्रवारपासून सुरू होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेल्पडेस्कची सुविधा
नागरिकांना कोविन अॅपच्या साह्याने ऑनलाइन नाव रजिस्टर करायचे आहे. https://selfregistration.cowin.gov. in या साइटवर जाऊनसुद्धा स्वतः घरात बसून रजिस्टर करू शकता येणार आहे. शिवाय काही अडचणी असल्यास किंवा बरेचदा ज्येष्ठ नागरिकांना हे शक्य होत नाही, त्यांनी थेट रुग्णालयातसुद्धा हेल्प डेस्कचे कर्मचारी त्यांना रजिस्ट्रेशन करून देण्यास मदत करणार आहेत.