नागपूर - 'तरुण भारत माहिती नाही, असे सांगून एकप्रकारे आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे महाराष्ट्रासमोर प्रदर्शन करणार्या स्वयंघोषित अनुभवी पत्रकाराचे अभिनंदनच करावे लागेल,' अशा शब्दात शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांचा आज तरुण भारतने अग्रलेखातून खरपूस समाचार घेतला आहे.
एका अग्रलेखावरून एखादा माणूस इतका अस्वस्थ होईल की महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्रांची नावंही विस्मरणात जातील असेही यात म्हटले आहे. राजकीय पक्षाचा प्रवक्ता म्हणून जर आपल्याला नागपूरचा 93 वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेला 'तरुण भारत' माहिती नसेल, तर आपल्याला प्रवक्ता म्हणून नेमणार्या नेत्याचा आपण अपमान करत आहत. याचे तरी किमान भान त्यांनी ठेवले पाहिजे असा सल्लाही यातून देण्यात आला आहे.
वेताळाने प्रश्न विचारले आणि विक्रम त्यावर उत्तर देत राहिला. कारण, तो वचनांना जागणारा होता. आज महाराष्ट्राची जनता विक्रमाच्या रूपाने प्रश्न विचारत आहे. त्याची उत्तरे देण्याचे सोडून आपले अज्ञान प्रगट करण्याचे काम कुणी करीत असेल तर ते खरंच दुर्दैवी आहे अशी टीकाही त्यात करण्यात आली आहे.
राज्यात भाजप वगळता कोणत्याच समीकरणाची जुळवाजुळव होऊ शकत नाही, हे जर एखाद्या शेंबड्या पोराला समजत असेल, तर ते यांना का कळू नये? असा टोलाही त्यांनी राऊत यांना लगावला आहे. वेळ अजूनही गेली नाही. जनादेशाचा सन्मान करण्याची जबाबदारी जशी भाजपची आहे, तशीच शिवसेनेची सुद्धा आहे. जनादेशाचा अर्थ हा या दोन्ही पक्षांनी समजून घेतला पाहिजे, असेही यातून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला पुढे आणले, त्यांचीच आयुष्याची कमाई मातीमोल करण्याची तयारी जर कुणी करीत असेल, तर महाराष्ट्रातील सामान्य शिवसैनिक हे कदापिही सहन करणार नाही असा सूचक इशाराही राऊत यांना या अग्रलेखातून देण्यात आला आहे.