नागपूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सावनेर तालुक्यातील उमरी खदान येथे धाड टाकली. हातभट्टीची अवैध दारू निर्मिती सुरू असलेल्या या ठिकाणी धाड टाकून तब्बल ६ हजार ९०० लिटर मोह दारू सडवा आणि २०० लिटर तयार मोहाची दारू नष्ट करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्य उत्पादन शुल्क विभाग सातत्याने अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई करत आहे. आत्तापर्यंत सुमारे १० लाखांपेक्षाही जास्त लिटर दारू आणि अवैद्य दारुचे साठे नष्ट करण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावनेर तालुक्यातील उमरी खदान परिसरात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची अवैध दारू निर्मिती केली जात आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने छापा मारुन ६ हजार ९०० लिटर मोह दारूचा सडवा आणि २०० लिटर मोह तयार दारू आणि २०० लिटर क्षमतेचे २५ बॅरेल आणि २०० लिटर क्षमता असलेले रसायन भरलेले २० बॅरेल यासह १ हजार लिटर क्षमतेच्या प्लास्टिक टाकीमधील सहवा नष्ट केला. कारवाईत एकूण पावणेदोन लाखांची दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नष्ट केली आहे. यापुढे देखील अशाच प्रकारची कारवाई सुरू राहणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.