नागपूर - मूळ शिवसेना पक्ष नेमका कुणाचा या वादावर अद्याप ही तोडगाचं निघालेला नाही. अशा परिस्थिती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने राज्यात आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एकनाथ शिंदे गटाने विदर्भावर फोकस केले आहे. पूर्व विदर्भात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्यात (Appointments of office bearers of Shinde group). आज खासदार कृपाल तुमाणे यांनी पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. यामध्ये नागपूर शहर, नागपूर जिल्हा, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यासाठी संपर्क प्रमुख, महानगर प्रमुख, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. लवकरच शिंदे गट विदर्भात राजकीय भूकंप घडवणार असे दिसते.
रामटेकचे लोकसभा खासदार कृपाल तुमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या काळाला नागपूर आणि अमरावती दौऱ्यावर येणार आहेत. ते दोन्ही जिल्ह्यात सभा देखील घेणार आहेत.
निवडणुका एकत्र लढणार - नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि अकोला येथे महापालिका निवडणुका होणार आहेत. शिंदे गटाने आतापासूनच याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. भाजप आणि शिवसेनेचे शिंदे गट महानगर पालिका निवडणूक एकत्र लढणार आल्याची माहिती खासदार कृपाल तुमाने यांनी दिली आहे.
पूर्व विदर्भात मोठा राजकीय स्फोट - मुख्यमंत्री शिंदे स्वतः विदर्भाचा दौरा करणार आहेत. यादरम्यान ते पूर्व आणि पश्चिम विदर्भात सभा घेणार आहेत. अनेक पक्षांचे नेते सतत त्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे नवरात्रीच्या काळात विदर्भात मोठा राजकीय धमाका होईल असे सूतोवाच कृपाल तुमाने यांनी केले आहे.
पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा - शिंदे गटाचे नेते किरण पांडव यांनी विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. त्याअंतर्गत नागपूर जिल्हा संपर्कप्रमुख मंगेश काशीकर, जिल्हाप्रमुख संदीप इटकीलवार, नरखेड शहरप्रमुख अजय बालपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर काटोल विधानसभा मतदारसंघाच्या उपजिल्हा प्रमुखपदी पुरुषोत्तम घोटे कायम राहणार आहेत. रितेश हेलोंडे काटोल हे विधानसभा निमंत्रक, तर मिलिंद देशमुख जिल्हा निमंत्रक म्हणून काम पाहणार आहेत. चंद्रपूर मध्ये सहसंपर्क प्रमुख पदाची जबाबदारी ही बंडू सहारे, तर जिल्हा प्रमुखपदी नितीन मते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय वर्धा जिल्हा प्रमुख गणेश इखार आणि जिल्हा संघटकपदी संदीप इंगळे यांना नियुक्ती देण्यात आली आहे. भंडारा जिल्हाप्रमुखपदी अनिल गायधने तर गोंदिया जिल्हाप्रमुखपदी मुकेश शिवहरे आणि सुरेंद्र नायडू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.