नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह भाषा वापरणारे नागपूर शहर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांच्या विरोधात आर्थिक अपहार केल्याचा गुन्हा सक्करदरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. नागपूरच्या प्रसिद्ध ताजबाग ट्रस्टमध्ये अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. शेख हुसेन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्यानंतर प्रकाश झोतात आले होते.
मोठा ताजबाग हे हिंदू आणि मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. ताजबग ट्रस्टमध्ये 2011 ते 2016 या काळात शेख हुसेन अध्यक्ष होते. त्यांच्या काळात अपहार झाल्याचा आरोप झाले आहेत. शेख हुसेन हे ताजबाग येथील हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टमध्ये अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात ट्रस्टमध्ये कोट्यावधी रुपयाचा अपहार केल्याची तक्रार दाखल झाली होती.
आरोपांमध्ये आढळले तथ्य - शेख हुसेन यांच्या विरोधात दाखल झालेल्या तक्रारीचा पोलिसांनी सखोल तपास केला. तक्रारीत तथ्य आढळून आल्यानंतर सक्करदार पोलिसांनी शेख हुसेन आणि तत्कालीन सचिव इकबाल इस्माईल बेलजी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आक्षेपार्ह भाषेत टीका प्रकरण - पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्या संदर्भात आक्षेपार्ह भाषेत टीका ( Offensive statement about Prime Minister Modi ) केल्याप्रकरणी नागपूर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसैन यांच्या विरुद्ध गिट्टीखदान पोलीस ठाण्यात 15 जून 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या मागणी नंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर शेख हुसेन यांनी तीव्र प्रतिक्रियाही दिली होती. ते म्हणाले होते की, मी माझ्या भाषणात एका म्हणीचा वापर केला, त्यात चुकीचे काहीही नव्हते, उलट आंदोलनात आलेल्या लोकांनी माझ्या भाषणाचे कौतुक केले आल्याचा दावा त्यांनी केला होता. मी कोणतीही चूक केलेली नाही. मी माफी मागण्याचा कोणताही प्रश्न निर्माण होत नसल्याचेदेखील ते म्हणाले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हेतुपुरस्सर गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 13 जूनला काँग्रेसच्या वतीने नागपूर ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. त्यावेळी मोदी सरकार विरोधात भाषणे झाली. पण याचदरम्यान काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांची टीका करताना जीभ घसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात ते आक्षेपार्ह बोलून गेले.