नागपूर- आगामी विधानसभा निवडणुकीत आरपीआयच्या आठवले गटाने 15 ते 20 जागांवर आपला दावा केला आहे. सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी या संदर्भात नागपूर येथे वक्तव्य केले आहे. एवढेच नाही तर त्यांनी विदर्भात सुद्धा काही जागा मिळाव्यात, अशी मागणी केली. लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षामुळेच महायुतीला घवघवीत यश मिळाले असे देखील ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि आरपीआय महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता महायुतीतील घटक पक्षांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपा संदर्भात फॉर्म्युला ठरलेला नसला तरी आरपीआयच्या आठवले गटाने मात्र 15 ते 20 जागेवर आपला दावा सादर केलेला आहे.
भाजप आणि शिवसेना लोकसभा निवडणूक जिंकावी, यासाठी आरपीआयच्या आठवले गटाने महत्वाची भूमिका बजावली असल्याचा दावा अविनाश महातेकर यांनी केला.