नागपूर - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. यासाठी राज्य सरकार म्हणून आम्ही मदत करत आहोत. परंतु, केंद्राकडे नैसर्गिक आपत्तीसाठी राखीव असलेला निधी महाराष्ट्राला मिळालाच नाही. यावरून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दुजाभाव करत आहे, अशी टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवाय गेल्या पाच वर्षापासून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी निती भाजपची राहिली आहे. अशात राज्य सरकारवर फक्त टीका करण्याचे काम भाजप करत असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
केंद्राने राज्य सरकारला मदत दिली नाही
महाराष्ट्रात अतिवृष्टीसह परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशावेळी राज्य सरकारकडून दिवाळीपूर्व मदतीचा पहिला टप्पा देण्यात आला. मात्र, यावरून भाजपकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. खास करून विदर्भातील शेतकऱ्यांना अपुरी मदत मिळत आहे, अशी टीका भाजप करत असल्याचे दिसून आले. याच टिकेला उत्तर देत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षासह केंद्रावर निशाणा साधला आहे.
केंद्राचे पाहणी पथक आलेच नाही
इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. मात्र, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून एक रुपयासुद्धा आला नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांबाबत दुटप्पी भूमिका घेत आहे. शिवाय केंद्राकडे राज्य सरकारने मदत मागूनही कोणताच प्रतिसाद मिळत नाही असे का? असा सवालही मंत्री वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. केंद्राला तीन पत्र लिहिले परंतु उत्तर का नाही? राज्यात परतीच्या पावसामुळे ४१ लाख हेक्टरचे नुकसान झाले. त्यासाठी राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांचे पँकेज जाहीर केले. याबाबत केंद्र सरकारला तीन पत्र लिहिले आणि पाहणी पथक पाठवण्याची मागणी केली. मात्र, दीड महिना ओलांडूनही केंद्राचे पाहणी पथक आलेच नाही. त्यामुळे राज्य सरकारवर टीका करणारे भाजप नेते अकलेचे तारे तोडत आहे, अशी टीकाही मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. शिवाय केंद्राचे पाहणी पथक न आल्याने राज्य सरकारकडूनच याबाबतचा अहवाल पाठवून मदतीची मागणी असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
हेही वाचा - कोकण रेल्वे मार्गावर चालत्या रो-रोमधून पडला ट्रक
हेही वाचा - मी पुन्हा येईन, पुन्हा गाईन : अमृता फडणवीसांचा नवा निर्धार