नागपूर - एक, दोन नव्हे तर तब्बल सात ते आठ इसम सशस्त्र दरोडा टाकण्याच्या उद्देशाने घराच्या कंपाउंडमध्ये घुसले होते. ही बाब घरातील महिलेच्या लक्षात येताच त्यांनी चोर-चोर म्हणत आरडाओरड सुरू केली. ओरडण्याचा आवाज ऐकू येताच सर्व दरोडेखोरांनी धूम ठोकल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरातील सिंधी कॉलनीत घडली आहे. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
घरातील महिलेला दिसला टॉर्चचा उजेड -
उमरेड शहरातील सिंधी कॉलनीत राहणाऱ्या प्रतिष्ठित व्यापारी महेश तोलानी यांच्या घरी मध्यरात्री 1 ते 2 वाजताच्या दरम्यान दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या बेताने आले होते. मात्र, त्यावेळी घरच्या मंडळींना टाॅर्चचा उजेड दिसला, त्यानंतर दरोडेखोरांचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी आरडाओरड केली. महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच सर्व दरोडेखोरांनी परिसरातून धूम ठोकली. त्यामुळे दरोडेखोरांचा डाव उधळला.
घटना सीसीटीव्हीत कैद -
तोलानी यांच्याकडे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सात दरोडेखोर शस्त्रांनीशी घरात प्रवेश करीत असल्याचे दिसून येत आहे. दरोडेखोर घरात शिरण्याचा प्रयत्न करत असताना तोलानी कुटुंबियांना जाग आली नसती तर दरोड्याची आणि कदाचित तोलानी कुटुंबियांना नुकसान पोहोचवणारी मोठी गुन्हेगारी घटना घडली असती.
उमरेड पोलिसांकडून सातही दरोडेखोरांचा शोध सुरू -
दरोडेखोर घरात प्रवेश करताना तोलानी कुटुंबातील महिलेने आरडाओरडा केल्यामुळे दरोडेखोर पळून गेले असले तरी संपूर्ण तोलानी कुटुंबीय प्रचंड दहशतीत आहेत. या घटनेची तक्रार उमरेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी सातही दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे.