नागपूर - रस्ते अपघातात लोकांचे जीव जातात त्याला या विभागातील अभियंते जबाबदार असल्याचा सडेतोड ठपका केंद्रीय वाहतूक व दळवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ठेवला आहे. डीपीआर बनवणारे इंजिनियर हे बोगस आल्याचेही ते म्हणाले. नागपुरात रस्ते सुरक्षा अभियान कार्यक्रमात त्यांनी महामार्गाची कामे करणाऱ्या अभियंत्यांवर ठपका ठेवत ताशेरे ओढले. या कार्यक्रमाला अभिनेता मकरंद अनासपुरे देखील उपस्थित होते.
महामार्गाची कामे करताना काही अभियंत्याकडून ज्या ठिकाणी एखाद्या अंडरपासची गरज असते तरही तो रद्द केला जातो, तर कधी बायपास रद्द केला जातो, मात्र का केले जाते? असा प्रश्न उपस्थित करत गडकरींनी अधिकाऱ्यांचा कामावर प्रश्न चिन्ह निर्माण केला. देशभरात रस्ते निर्माण विभागाकडून 12 हजार कोटी खर्च करून अपघात कमी करण्यासाठी ब्लॅक स्पॉट दुरुस्त करण्याचे काम करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले. मात्र, विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणाली किती बोगस आहेत, याकडेही लक्ष वेधत दुर्भाग आहे.. आपला देश कसा चालतोय? असा ठोक सवाल करत अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली.
मकरंद अनासपुरे यांनी देशातील रस्ते पाहता आता समाधान होत असल्याचे मत व्यक्त केले. आपल्या देशाला, राज्याला आणि नागपूरला एक व्हिजन असलेला, दूरदृष्टी ठेवणारा गडकरींसारखा नेता लागला, हे आपले भाग्य असल्याचेही अनासपुर म्हणाले. मात्र, देशातील नागरिक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत, वाहतूक पोलीस जीवतोडून रस्त्यावर उभे राहून काम करतात. अशा वेळी नियम तोडून त्यांचासोबत भांडण करायला नको, एके ठिकाणी काम करणाऱ्या वाहतूक पोलिसाला फरफटत घेऊन जाणे ही दुर्दैवी घटना असल्याचेही मत अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले.
अपघात मरणाऱ्याची संख्या महामारीपेक्ष अधिक असणे चिंतेचे-
महामारीत मरत नसतील तेवढे लोक अपघातात मरतात, हे सगळे नकळत होते, आणि कुटुंब उद्ध्वस्त होते. विना हेल्मेट घालण्यात काय पुरुषार्थ आहे ? असा सवालही त्यांनी नियम तोडत फिरणाऱ्यांना केला. नियमाचे पालन करा आणि जे नियमाचे पालन करत नसतील त्यांना कठोर शिक्षा करायलाच हवी असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.