नागपूर - शहरात कोरोनाची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यातच दोन मुख्य सण ऐन तोंडावर आल्याने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपूर महानगर पालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. ज्यामध्ये होळी, धुलीवंदन आणि शब-ए-बारात सार्वजनिक ठिकाणी साजरी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
शहरात आणि जिल्ह्यात ३५ हजारांच्या वर सक्रिय रुग्ण आहेत. दरदिवशी साडेतीन हजारांपेक्षा अधिक रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. तर गेल्या पाच दिवसात २०० पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. संपूर्ण जिल्ह्यात इतकी भीषण परिस्थिती असताना देखील नागरिकांमध्ये गांभीर्य नसल्याने यंदाची होळी नागपूरकारांना घरीच राहून साजरी करावी लागणार आहे. सोबतच शब-ए बारात साजरी करण्यास सुद्धा मनाई करण्यात आली आहे. तर मिरवणूक काढण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. शहरात कुठेही पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. धुलीवंदनाच्या दिवशी म्हणजेच 29 मार्चला खासगी आणि शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
काय बंद असणार -
महानगर पालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दिलेल्या आदेशानुसार २९ मार्च रोजी शहरातील बहुतांश दुकाने, मार्केट, वाचनालये, हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार आहेत. मात्र किराणा, भाजीपाला, मटण, मांस दुकाने दुपारी एकपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत.
नागरिकांमध्ये संभ्रम, मनपाचा खुलासा -
महानगरपालिकेतर्फे 29 मार्च रोजी मनपा आयुक्तांनी होळी आणि शबे बारात साजरा करण्यासंबंधी आदेश निर्गमित केले आहे. त्यानंतर काही लोक चुकीचा अर्थ लावून असे गैरसमज निर्माण करीत आहेत, की येत्या शनिवार व रविवारी सुद्धा दुकाने बंद राहतील. याबाबत पालिकेकडून खुलासा करण्यात आला असून 20 मार्चच्या आदेशानुसार येत्या शनिवार 27 मार्च आणि रविवार 28 मार्चला सर्व खासगी दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत तसेच हॉटेल, रेस्टॉरंट संध्याकाळी 7 वाजेपर्यंत व पार्सल सुविधा 11 वाजेपर्यंत सुरू राहील.
हेही वाचा - पुण्यातील लॉकडाऊनबाबत 2 एप्रिलला होणार निर्णय