नागपूर - गुन्हेगारी ते खेळाचे मैदान हा मागील 20 वर्षाचा संघर्ष झुंड चित्रपटातून ( Zund Movie ) समोर आला. यातून 'स्लम सॉकर' हा घरोघरी ( Slum Soccer Football Tournament ) पोहचला. महानायक अमिताभ बच्चन ( Actor Amitabh Bachchan ) यांच्या अभिनयाचे कौतुकही झाले. दिगदर्शक नागराज मंजुळे ( Director Nagraj Manjule ) यांनी हा संर्घष तेवढ्याच ताकदीने लोकांसमोर मांडला. पण अमिताभ यांनी ज्यांची भूमिका बजावली अशा 'रियल लाईफ'मधील हिरो विजय बारसे ( Sport Trainer Vijay Barse ) यांचा प्रायोजक मिळण्याचा संघर्ष सुरूच आहे. काय आहेत त्यांच्या नेमक्या अडचणी, जाणूज घेऊयात या खास रिपोर्टमधून.
दोन दशकांचा संघर्ष : स्लम सॉकर ही एक फुटबॉल स्पर्धा आहे. याच स्पर्धेसाठी क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे यानी आपले जीवन वाहून घेतले. झोपडपट्टीतील मुलांना गुन्हेगारी जगण्यातून बाहेर काढत मैदानावर ताकद दाखवण्यासाठी संघर्ष केला. सुरवातीला एक एक मुलांला खेळाच्या मैदानापर्यंत नेण्याचा संघर्ष, त्याना फुटबॉल खेळात आंतरराष्ट्रीय प्राविण्य मिळावे म्हणून त्या दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा संघर्ष होता. असा हा पदोपदी असलेला संघर्ष पाच, दहा वर्षाचा नाहीतर दोन दशकांचा संघर्ष आहे. हाच संघर्ष चित्रपटगृहात जाऊन प्रेक्षकांनी पहिला आणि विजय बारसे यांच्या कार्याला कौतुकाची थाप दिली.
स्लम सॉकरचा संघर्ष सुरूच : स्लम सॉकर ही फुटबॉल स्पर्धा 2001 पासून घ्यायला सुरुवात झाली. हळूहळू याचा प्रसार हा भारतापुरता मर्यादित न राहता सात समुद्रापार अनेक देशात जाऊन पोहचला आहे. यातच सप्टेंबर महिन्यात होमेलेस संस्थेकडून न्यूयॉर्कमध्ये फुटबॉल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी खेळाडूची गरज आहे. यासाठीच येत्या मे महिन्यात राष्ट्रीय स्तरावर स्लम सॉकर स्पर्धा होणार आहे. पण या स्पर्धेसाठी अद्याप प्रायोजक मिळाले नसल्याने आर्थिक भांडवल उभारणीचा प्रश्न समोर उभा ठाकला आहे. यात काही औद्योगिक घराण्यांकडून विचारणा झाली असली तरी, अद्याप ठोस काही हाती लागले नाही. पण यावर विजय बारसे यांनी हार मानली नाही. त्यांना दृढ विश्वास आहे की, या स्लम सॉकर स्पर्धेसाठी लवकरच प्रयोजक मिळेल.
स्लम सॉकरला मिलियनची गरज : स्लम सॉकर ही स्पर्धा मे महिन्यात पिंपरी चिंचवड किंवा नागपुरात घेण्याचे प्राथमिक स्तरावर नियोजन सुरू आहे. यात जवळपास 500 खेळाडू आणि 100 प्रशिक्षक असे 600 लोक सहभाग घेणार आहे. यामध्ये 25 टीम मुलांच्या आणि 25 मुलींच्या टीम असणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येनं स्पर्धकासाठी खर्चही मोठाच असणार आहे. यात सर्वाधिक खर्च हा मैदानावर असतो. यासाठी सर्वाधिक खर्च टर्फसाठी (फुटबॉल साठी लागणारे मैदानावरील मॅट) साधारण 25 लाखापर्यंत खर्च हा त्यासाठी लागत असल्याच विजय बारसे सांगतात. यासोबत खेळाडूंचा राहण्याचा, ट्रॅव्हलिंग, जेवण किट या सर्व बाबींवर मोठा खर्च येतो. यातच वाढती महागाई पाहता 1 कोटी 20 लाखाचा घरात हा संघर्ष आहे.
टाटांशी कंपनीशी बोलणं सुरू, नीता अंबानी यांचेही खेळावर विशेष प्रेम : यात पहिल्या टप्प्यात तरी टाटा कंपनीच्या हैद्राबादच्या कार्यालयाकडून संपर्क करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत बोलणी सुरू आहे. महिंद्रा यांच्याशी संपर्क सुरू आहे. नीता अंबानी यांनाही खेळात रस आहे. त्यामुळे येत्या काळात या मोठ्या उद्योगपती कुटुंबाकडून सीएसआरच्या माध्यमातून मदतीचा हात मिळेल अशी आशा क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी सोनी कंपनीकडून तीन वेळा प्रयोजक म्हणून मदत झाली आहे. चित्रपट येऊन जेमतेम एक महिना झाला आहे. त्यामुळे याला प्रतिसाद मिळेल, यात शंका नाही असेही विजय बारसे बोलून दाखवतात. इतकेही करून ही प्रायोजक मिळाला नाही तरी, काही ना काही नियोजन नक्कीच होणार असे ते सांगतात.
नागराज मंजुळे म्हणतात प्रायोजक मिळायला हवा : स्लम सॉकरच्या संघर्षाला झुंड चित्रपटाच्या माध्यमातून लोकांनी पसंती दिली. प्रायोजक मिळत नसल्याचे नागराज मंजुळे यांना विचारले असता त्याबद्दल फारशी माहिती नाही, पण प्रयोजक मिळावे असे त्यांनी बोलून दाखवले.