नागपूर - आपल्या देशातील सर्वात अग्रणी कोळसा उत्खनन करणारी कंपनी म्हणून वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड कंपनीचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये आर्थिक नुकसान करणारी ही कंपनी आता सरासरी दोनशे ते अडीचशे कोटी रुपयांचा नफा कमावून देत असल्याचा दावा मुख्य व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्र यांनी केला आहे. ते या महिन्याच्या ३१ तारखेला सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांनी सहा वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामाची माहिती दिली. त्याच्या कार्यकाळात खदानींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्यात असलेल्या क्षमतेची ओळख करून दिल्यानेच वेकोलीची आर्थिक स्थिती इतर कोळसा उत्खनन करणाऱ्या कंपनीच्या तुलनेत सक्षम झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सेवानिवृत्त होण्यापूर्वी वेकोलीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सिएमडी) राजीव रंजन मिश्र यांनी पत्रकारांची अनौपचारिक चर्चा केली, यावेळी ते म्हणाले आहे की २०१५ मध्ये त्यांनी सिएमडी म्हणून वेकोली मध्ये पदभार स्वीकारला होता. त्यावेळी कंपनी पुढे मोठे आर्थिक संकट उभं होत. निर्धारित टार्गेट देखील पूर्ण करणे कठीण झाले होते. आर्थिक तोटा वाढत असल्याने भविष्यात वेकोली बंद होणार किव्हा खासगीकरण केले जाणार असे दुहेरी संकट ओढवले होते. यावेळी आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्यात असलेल्या क्षमतेची ओळख करून दिली. त्यानंतर हळूहळू परिवर्तन दिसायला सुरवात झाली. या काळात २३ नवीन कोळसा खाणी सुरू करण्यात आल्या, ज्यामुळे उत्पादन देखील झपाट्याने वाढायला सुरवात झाली. आजच्या घडीला वेकोली वर्षाकाठी ५७.६४ मिलियन टन कोळश्याचे उत्खनन केले असून ते निर्धारित टार्गेट पेक्षा ३ टक्के अधिक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. विदर्भातील चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी या भागात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहेत. मात्र, इथला कोळसा जमिनीच्या फार खोलात असल्याने कोळश्याचे उत्खनन करणे महाग पडत होते. यामुळे कोळश्याचे दर थोडे फार जास्त आहेत. मात्र, इथल्या महजेनको,एनटीपीसी सह अनेक वीज उत्पादक कंपन्यांना वेकोली कडून कोळसा पुरवठा केला जात असल्याने जेवढी मागणी आहे, ती पूर्ण करण्यात वेकोली यशस्वी ठरत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
उत्पादन वाढवण्यासाठी नव्या खाणी सुरू करणे गरजेचे -
कोळश्याची एकूण मागणी लक्षात घेता उत्पादन वाढवणे हा एकमेव पर्याय आहे. मात्र, नवीन खाणी सुरू केल्याशिवाय कोळश्याचे उत्पादन वाढणार नव्हते, त्यामुळे गेल्या सहा वर्षात २० खाणी सुरू करण्यात आल्या आहेत. येत्या दोन वर्षात आणखी ३ खाणी सुरू केल्या जाणार आहेत. यामाध्यमातून १०० मिलियन टन पेक्षा जास्त कोळश्याचे उत्खनन केले जाणार आहे. उडिशा येथे देखील तीन मोठ्या कोळसा खानी सुरू करण्याची तयारी झाली आहे. त्या भागातील कोळसा हा जमिनीच्या फार खोल नसल्याने तेथून मोठ्याप्रमाणात कोळश्याचे उत्पादन मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मिशन मोड वर काम केल्यानेच कंपनीचा फायदा -
ज्यावेळी वेकोली ही कंपनी आर्थिक तोटा सहन करत होती, त्यावेळी कर्णधार म्हणून सिएमडी राजीव रंजन मिश्र यांनी मिशन मोड वर काम करण्याची सूचना सर्वाना केली होती. त्यावेळी शंभर दिवसांचे मिशन नियोजीत करण्यात आले होते. या मिशन नंतर कंपनीला तब्बल दोनशे कोटींपेक्षा जास्तचा नफा प्राप्त झाला होता. सर्वकाही सुरळीत होतंय असे वाटत असताना २०१६,१७ आणि २०१८ या वर्षात पुन्हा आर्थिक संकट निर्माण झाले होते. त्यावेळी सुद्धा नवीन मिशन घोषित करण्यात आले होते. आपले ग्राहक कसे वाढतील यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले,ज्यामुळे हे संकट देखील हळू हळू दूर झाले असून वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड ही कंपनी आज नवीन आवाहन स्वीकारण्यासाठी तयार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.