नागपूर : नागपूर शहरात अवैधपणे सुरू असलेल्या हवाला व्यावसायिकांवर(Hawala Business) पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. रात्री उशिरा पोलिसांनी एकाच वेळी नऊ ठिकाणी धाडी टाकल्या. यामध्ये ८४ लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली असल्याची माहिती पुढे आली आहे.
एकाच वेळी नऊ ठिकाणी धाडी
पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या नेतृत्वात झालेल्या या कारवाईत एकाच वेळी नऊ हवाला व्यावसायिकांवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश चेंबरसह अन्य ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या. त्यामुळे हवाला व्यवसायिकांमध्ये खळबळ माजली आहे. एकट्या नागपूर शहरात शेकडो हवाला व्यावसायिक असून त्यांच्यामार्फत अवैधरित्या हजारो कोटी रुपयांचा व्यवसाय केला जात असल्याची चर्चा होती. पोलिसांना या ठिकाणी सुमारे २०० पेक्षा अधिक लॉकर आढळून आले आहेत. याशिवाय पैसे मोजण्याच्या मशिन्ससुद्धा मिळून आल्या आहेत. पोलिसांच्या कारवाईनंतर प्राप्तिकर खात्याचे अधिकारी देखील या कारवाईत सहभागी झाले आहे. त्यांनी शेकडो लॉकर्स सील केले असून चौकशी सुरू केली आहे.
डीसीपी गजानन राजमाने यांचा कारवाईचा धडाका
तब्बल अडीच वर्षे नागपूर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून दमदार कामगिरी केल्यानंतर डीसीपी गजानन राजमाने यांची बदली पोलीस उपायुक्त-३ म्हणून करण्यात आली होती. त्यांनी नेमणूकीच्या ठिकाणी सुद्धा गुन्हेगारांच्या मुसक्या अवळण्यास सुरुवात केली आहे. गुन्हे शाखेत कार्यरत असताना त्यांनी अनेक मोठ्या गुंडांचा कायमचा बंदोबस्त केला,ज्यामध्ये डॉन संतोष आंबेकर सह रणजीत सफेककर यांचा समावेश आहे. आता त्यांनी परिमंडळ ३ मध्ये सुद्धा अवैध धंद्यांवर कारवाई सुरू केली असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.