नागपूर - भीषण गर्मीत कोरोना संशयितांना विविध भागांतील विलागीकर कक्षात ठेव्यात आले आहे. मात्र कुठे पिण्याच्या पाण्याची सोय नाही, तर कुठे निकृष्ट जेवण पुरवले जात असल्याचा आरोप करत विलगीकरण कक्षातील नागरिकांनी गोंधळ घातला आहे.
नागपुरात क्वारंटाइन सेंटर दररोज या ना त्या कारणांनी चर्चेत येत आहे. कधी जेवणात अळ्या, जेवण वेळेवर न मिळणे, तर कधी अस्वच्छतेवरून क्वारंटाईन सेंटरच्या तक्रारी येताहेत. व्हीएनआयटी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये सकाळी जेवणात पोळ्या कडक आणि काळ्या आल्याने अनेकांनी जेवण केलेच नाही. तर रात्रीच्या जेवणातील वरणात अळ्या निघाल्याचा आरोप विलगीकरण कक्षातील नागरिकांनी केला आहे. त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला.
या क्वारंटाईन सेंटरमध्ये लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि काही बाळंतीण महिलाही आहेत. त्यांना सकस आहाराची गरज आहे. मात्र, अशा निकृष्ट जेवणामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे. तर दुसरीकडे जरीपटका येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये पिण्याचे पाणी संपल्याने तिथे ठेवण्यात आलेल्या नागरिकांनी गोंधळ घातला. पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या गोंधळात फिजिकल डिस्टस्टिंगचा फज्जा उडाला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्वारंटाईन सेंटरमधील जेवणाबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत. मात्र, वारंवार येणाऱ्या तक्रारींकडे प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच या सेंटरमधील लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाने ही बाब गंभीरपणे घेण्याची गरज आहे.