नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले ( Nawab Malik Arrested ) आहे. कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी पक्षाकडून ठिकठिकाणी आंदोलन पुकारण्यात आले आहे.
नागपुरात काळ्या पट्या बांधून आंदोलन
नागपुरातील व्हेरायटी चौकात गांधीजींच्या पुतळ्याजवळ बसून शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वाखाली डोक्याला आणि हाताच्या दंडावर काळा पट्या बांधून ईडीच्या कारवाईचा निषेध करण्यात आला. यावेळी केंद्र सरकार जाणीवपूर्ण ईडीच्या माध्यमातून कारवाई करत असल्याचाही आरोप दूनेश्वर पेठे यांनी केला. भाजपाचे नेते 15 दिवस पहिले बोलतात मग ईडीचे अधिकारी कारवाई करतात, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
जळगाव
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक केल्याच्या निषेधार्थ आज जळगावात राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे काळ्या साड्या परिधान करुन अनोख्या पद्धतीने केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. मोदी सरकार हाय हाय भाजप हाय व्हा रे मोदी तेरा खेल चोरो को छोडके साधू को जेल, अशा घोषणाही देण्यात आल्या.
नंदूरबार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहादा शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करत केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी ईडी विरोधात आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी हातात घेतलेले फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. आंदोलनात राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आज दिवसभर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली.
अटकेच्या निषेधार्थ सिंधुदुर्गात निदर्शने
कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ महा विकास आघाडीच्या वतीने आज सिंधुदुर्गात ठीक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्रातील मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सावंतवाडी येथील गांधी चौकातही जोरदार आंदोलन छेडण्यात आले.
केंद्र सरकार जब-जब डरती है, ईडी को आगे करती है, पुण्यात कार्यकर्ते आक्रमक
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ई़डीने अटक केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकरच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि नवाब मलिक यांच्या अटकेचा निषेध नोंदवला. ‘गांधी लढे थे गोरो से, हम लढेंगे चोरो से’, ‘केंद्र सरकार जब-जब डरती है, ईडी को आगे करती है’, अशा घोषणा देत युवा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला. यावेळी राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, “ईडीने केलेली कारवाई बेकायदेशीर आहे. केंद्र सरकार अडचणीत आले की, सत्तेचा गैरफायदा करते. मलिकांना ईडीने केलेली ही अटक त्याचंच उदाहरण आहे.”
हेही वाचा - Pravin Raut remanded in judicial custody : प्रवीण राऊत यांना 7 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी