नागपूर - वीजबिल दरवाढीविरोधात विदर्भवादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संघटनांकडून आज पुन्हा एकदा नागपूरमध्ये विद्युत केंद्रांना 'ताला ठोको' आंदोलन करण्यात आले. वीजबिलात झालेली वाढ ही अन्यायकारक आहे. याची सामान्यांना मोठी झळ बसत आहे. असा आरोप करत, वीजबिल कमी करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. शहरातील पॉवर हाऊससमोर हे आंदोलन करण्यात आले.
उत्पन्नच घटल्याने सवलतीची मागणी
कोरोना काळातील वीजबिलावरून सर्वच त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्र शासनाने वाढीव वीजबिलात सूट देऊन, सर्वसामान्यांना दिलासा द्यावा. यासाठी विविध राजकीय पक्ष, संघटनाकडून आंदोलने केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने विद्युत केंद्राला ताला ठोको आंदोलन करण्यात आले. गेल्या ५ माहिन्यांपासून कोरोनामुळे रोजगार नाही. त्यात वीजबिलाचे पैसे द्यायचे कसे असा सवाल यावेळी आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.
आंदोलन शमवण्यासाठी पोलिसांचा हस्तक्षेप
आक्रमक आंदोलनकांनी थेट विद्युत केंद्रात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. आंदोलकांनी ऊर्जा मंत्र्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.