नागपूर - २०१९ साली कोरोनाचा धोका वाढल्यामुळे तब्बल दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा आता ४ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे. कधी एकदाची शाळा सुरू होते, असे विद्यार्थ्यांसह शिक्षकांनादेखील वाटू लागले आहे. मात्र, केव्हा सुरु शाळा होईल आणि केव्हा बंद पडेल, या गोष्टीचा काहीही फरक न पडणारा एक विद्यार्थी वर्ग देखील अस्तित्वात आहेय. त्याला शासकीय भाषेत शाळाबाह्य विद्यार्थी वर्ग, असे म्हटल जाते. शाळाबाह्य विद्यार्थी किती आहेत, याचीदेखील नोंद सरकार दरबारी नसेल. एकीकडे सर्व शिक्षा अभियानावर हजारो कोटी खर्च केल्यानंतरदेखील शिक्षणाच्या प्रवाहा बाहेर असलेल्या या हजारो-लाखो शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी उपराजधानी नागपुरात कार्यरात आहेत. ती म्हणजे 'उपाय' नामक संस्था. 'उपाय' संस्थेच्या मार्फतच नागपुरात तब्बल दहा केंद्रांवर फूटपाथ शाळा भरवली जाते. गेल्या १२ वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाअंतर्गत तब्बल 10 ते बारा हजार मुल साक्षर झाली आहेत. एवढचे काय तर याच फूटपाथ शाळेतून शिक्षण घेतलेली एक विद्यार्थिनीने उंच झेप घेण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर संस्थेच्या मदतीने तिने आता बॅचलर ऑफ सोशल वर्कच्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवला आहे, हेच 'उपाय' या संस्थेचे यश असून सर्वशिक्षा अभियानाचे अपयश आहे, असे म्हटल तर मुळीच वावगे ठरणार नाही.
'उपाय'मुळे अनेक मुले-मुली दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण -
सर्व शिक्षा अभियानाचा मोठा गाजावाजा सुरू असतानादेखील हजारो विद्यार्थी आजही शिक्षणापासून वंचित आहेत. शिक्षणाचे खासगीकरण जोरात सुरू असताना राज्य शासन संचालीत अनेक शाळा बंद होत आहेत. या शाळांसाठी विद्यार्थीच मिळत नसल्याची कायम ओरड असते. शाळा बंद होण्याचे प्रमाण वाढत असल्याने गोर-गरीब विद्यार्थी शाळेचा उंबरठादेखील चढू शकत नसल्याचे भयाण वास्तव राज्याच्या प्रत्येक शहरात, जिल्ह्यात आणि गावात बघायला मिळेल. शिक्षण घेण्यासाठी शाळेत जाता येत नसलेल्या विद्यार्थ्यांनी संख्या थोडी थोडकी नसून लाखोंच्या घरात आहे. नागपुरातसुद्धा शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. अश्या शाळाबाह्य मुला-मुलींमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचा वसा नागपुरातील 'उपाय' नामक संस्थेने घेतला आहे. सामाजिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी या संस्थेचे स्वयंसेवक रस्त्यांवर भटकंती करणाऱ्या कामगार वर्गाच्या चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. आज त्यांच्याच प्रयत्नांमुळे नागपुरातील अनेक मुले-मुली दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून कॉलेजपर्यंत पोहोचले आहेत, हे विशेष.
हेही वाचा - पंचनामे होत राहतील, त्याआधी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा; राज ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
शाळाबाह्य मुलांमध्ये शिक्षणाची गोडी -
नागपूर शहरातील सीताबर्डी भागात असलेल्या अंबाझरी मार्गांवर फुलझाडे विकणारे, टेडी बियर विकणारे आणि खेळणी विकणारे अनेक कुटुंब फूटपाथवर वास्तव्यास आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या कुटुंबांनी फूटपाथवर संसार मांडला आहे. त्याची मुलेदेखील लहानाची मोठी होऊ लागली आहेत. त्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी 'उपाय' संस्था गेल्या १२ वर्षांपासून कार्यरत आहे. आज त्यांच्याच प्रयत्नांमुळे नागपुरातील अनेक मुले-मुली दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून कॉलेजपर्यंत पोहोचले आहेत, हे विशेष. आता त्यांना अभ्यास करण्यासाठी सांगावं लागत नाही. कुटुंबाच्या व्यवसायात मदत करतानाच या चिमुकल्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण झाली आहे.
शीतलला व्हायचंय नर्स -
गेल्या अनेक वर्षांपासून शितलचे संपूर्ण कुटुंब फुटपाथवर खेळणी विकण्याचे काम करत आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बघता कधी शाळेची पायरी सुद्धा चढायला मिळेल, असे स्वप्नांत सुद्धा वाटले नव्हते, असे ती सांगते. मात्र, 'उपाय' संस्थेच्या मदतीने माझे प्राथमिक शिक्षण सुरू झाले. बघता बघता मी दहावी नंतर बारावी सुद्धा उत्तीर्ण झाले आणि आता बॅचलर ऑफ सोशल वर्कच्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवला आहे. माझ्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उपाय संस्थेकडूनच करण्यात आला. त्यामुळे माझ्या यशाचे खरे मानकरी 'उपाय' संस्थेतील प्रत्येक सदस्य असल्याचे ती गर्वाने सांगते.