नागपूर - उपराजधानी नागपुरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम अगदी जोरात सुरू असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी उपजिल्हा रुग्णालयातील एक परिचारिका कोरोनावरील लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
मोहिमेत पहिल्या टप्प्यातच लसीकरण
संबंधित परिचारिकेला आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या मोहिमेत पहिल्या टप्प्यातच लसीकरण झाले होते. ४२ वर्षीय परिचारिकेने जानेवारी महिन्यात कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात विहित वेळी त्यांना लसीचा दुसरा डोसही देण्यात आला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या.
कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह
संबंधित परिचारिकेला लसीचा दुसरा डोस घेऊन १४ दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र, त्यांच्या कुटुंबातील इतर काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर नियमानुसार त्यांची चाचणी करण्यात आली आणि त्यामध्ये ती परिचारिकाही पॉझिटिव्ह आढळली आहे. होम आयसोलेशनदरम्यान पॉझिटिव्ह परिचारिकेला कुठलीही तीव्र लक्षणे नसून प्रकृती स्थिर आहे. कोरोना प्रोटोकॉलनुसार त्या होमआयसोलेशनमध्ये आहेत. आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित परिचारिकेचे सिटी स्कॅनही करण्यात आले असून त्यात संक्रमण अत्यंत सौम्य असल्याचे आढळले आहे.