नागपूर - कोरोनाचे वाढते संक्रमण थांबवण्यासाठी अनेक शहरांमध्ये मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी देखील त्यासंदर्भात आवाहन केले आहे. मास्क घालून कोरोनाला पराभूत करण्याच्या या मोहिमेला बळकट करण्यासाठी काही पेट्रोल पंप चालकांनी हे पाऊल उचलले आहे.
वाहनचालकांनी मास्क न वापरल्यास त्यांना पेट्रोल मिळणार नसल्याचा निर्णय पेट्रोल पंप चालकांनी घेतलाय. त्यामुळे नागपुरात पेट्रोल मिळवण्यासाठी प्रत्येक जण मास्क घालून येत आहे. नागपूरच्या जाफरनगर परिसरातील एका पेट्रोल पंपाने सर्वात आधी ही सक्ती लागू केली. त्यानंतर शहरात अनेक पेट्रोल पंपानी त्याचे अनुकरण केले. त्यामुळे नागपुरात 'नो मास्क, नो पेट्रोल' या नव्या मोहिमेला बळकटी मिळालीय. यामुळे नागरिक मास्क घालूनच बाहेर पेट्रोल पंपांवर येत आहेत. तसेच अनेक पंपांवर कोरोनाबद्दल जनजागृती करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन देखील होत आहे.