नागपूर - सरोगसीच्या नावावर प्रेमप्रकरणातून जन्माला आलेल्या नवजात मुलीची विक्री सात लाख रूपायांमध्ये करणाऱ्या डॉक्टर आणि त्याच्या दलालाला नागपूर पोलिसांनी अटक केली ( Newborn girl sold for Rs 7 lakh Nagpur ) आहे. एवढेच नाही तर या डॉक्टरने ज्यांना नवजात मुलीची विक्री केली, त्यांना ते बाळ सरोगसी मातेकडून जन्माला आल्याचे सांगितले होते. या प्रकरणाची गुप्त तक्रार पोलिसांकडे आल्यानंतर पोलिसांनी चौकशी करून डॉक्टर विलास भोयर, राहुल निमजे आणि नरेश राऊतला अटक केली आहे. पोलिसांच्या एका पथकाने हैदराबाद येथे जाऊन बाळासह एका दाम्पत्याला ताब्यात घेतले आहे.
काय आहे प्रकरण -
नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या एका महिलेला प्रेम प्रकरणातून गर्भधारणा झाली होती. अनैतिक संबंधातून झालेली गर्भधारणेमुळे पोटातील गर्भपातकरीता त्या महिलेने आरोपी डॉ. विलास भोयर यांना संपर्क साधला होता. त्याच दरम्यान हैदराबाद येथील एका दांपत्याला मूलबाळ होतं नसल्याने सरोगसीच्या माध्यमातून बाळ जन्माला घालण्याची त्यांची इच्छा असल्याची माहिती या डॉक्टरला भोयरला मिळाली. त्यानंतर डॉक्टरने त्या महिलेला बाळ जन्माला घालण्यासाठी राजी करून घेतले, अर्थात या कामाच्या मोबदल्यात मोठी रक्कम मिळेल असे आश्वासन देण्यात आले होते. बाळाला जन्म देण्यासाठी महिला तयार झाल्यानंतर आरोपी डॉक्टरने हैदराबाद येथील दाम्पत्याला संपर्क साधून सरोगेसी गर्भधारणे करीता एक महिला तयार असल्याची माहिती दिली. त्याकरीता डॉक्टरने सात लाख रुपये त्याने वसूल केले होते. त्या दाम्पत्याला संशय येऊ नये म्हणून डॉक्टरने त्यांच्यावर उपचार सुरू करून त्यांचे शुक्राणू मिळवले होते.
महिलेने दिला मुलीला जन्म -
28 जानेवारी रोजी त्या महिलेने एका मुलीला जन्म दिला. डॉक्टरांनी त्या नवजात मुलीचे खोटे कागदपत्र तयार सुद्धा करून घेतले. सर्व प्रक्रिया रीतसरपूर्ण केल्यानंतर डॉक्टरने त्या नवजात मुलीला सात लाख रुपये घेऊन हैदराबादच्या दाम्पत्याला विक्री केली.
असे फुटले बिंग -
डॉक्टरने नवजात बालिकेची सात लाख रुपयात विक्री केल्याची गुप्त तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. या तक्रारीची अतिशय गोपनीय पद्धतीने चौकशी करण्यात आली, त्यावेळी आरोपांमध्ये तथ्य आढळून आले. पोलिसांनी लगेचच एक पथक हैदराबाद येथे पाठवून नवजात मुलीसह त्या दाम्पत्याला ताब्यात घेतले, त्यांची चौकशी केल्यानंतर डॉक्टर विलास भोयर याने सरोगसीच्या नावावर त्यांची फसवणूक केल्याची माहिती पुढे आली. ज्याच्या आधारे पोलिसांनी डॉक्टर विलास भोयरसह तिघांना अटक केली आहे.
हेही वाचा - संजय दत्त आणि पाकिस्तानचे पूर्वाध्यक्ष परवेझ मुशर्रफ एकाच फोटोत कैद