नागपूर - भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी महापौर संदीप जोशी यांनी खासगी रुग्णालयांना इशारा देताच एका रुग्णालयाने उपचाराचे बिल चक्क अडीच लाखांनी कमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. कोरोनावर उपचार करण्यासाठी या हॉस्पिटलने रुग्णाकडून तब्बल पाच लाख रुपये वसूल केले होते. मात्र संदीप जोशी यांनी प्रत्यक्षात बिल तपासून घेतले तेव्हा मोठा घोळ आढळून आला. संदीप जोशी यांनी ऑडिटरकडून बिल तपासून घेतले असता हॉस्पिटलने अडीच लाख रुपये अतिरिक्त वसूल केल्याची बाब पुढे आली, तेव्हा हॉस्पिटलने तातडीने ते पैसे रुग्णाला परत केले आहेत.
शहरातील काही खासगी रुग्णालये कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन गरीब रुग्णांची लूट करत असल्याचा आरोप करत नागपूर शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांनी ही लूट थांबली नाही तर रस्त्यावर उतरू असा इशारा दिला होता. त्यांनी दिलेल्या या इशाऱ्याचा असर देखील बघायला मिळू लागला आहे. नागपूरात कोरोना रुग्णाचं पाच लाखांचं बील चक्क ३० मिनीटांत आलं अडीच लाखांवर आल्याचा प्रकार पुढे आला आहे. न्यू इरा हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून सोमेश दिपानी यांच्या पत्नीच्या उपचाराचे बिल न्यू इरा रुग्णालयाने चक्क पाच लाख रुपये काढले होते. या संदर्भात दिपानी यांनी माजी महापौर संदीप जोशी यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेऊन संदीप जोशी हॅास्पीटलमध्ये धडकले होते. जोशी यांनी चौकशी केल्यानंतर पाच लाखांचं बिल झालं अडीच लाख करण्यात आले आहे. अशाच प्रकारे नागपूरमध्ये अनेक रुग्णालयांकडून गरीब कोरोनाबाधित रुग्णांची सर्रासपणे लूट सुरू असल्याचे अधोरेखित झाले आहे.
पीडित रुग्णांनी आपले बिल तपासून घ्या -
एकीकडे शासनाने खासगी हॉस्पिटलला स्पष्ट सांगितले आहे, की ८० % शासकीय दराने तर २०% खासगी दराने रुग्ण दाखल करावे. परंतु याकडे प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष आहे. काही हॉस्पिटल्स या दुर्लक्षाचा वापर करून ऑडीटरसह रूग्णांची लूट करीत आहे. पिडीत रूग्णांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा आणि बिल तपासून घेण्याचे आवाहन संदीप जोशी यांनी केले आहे.
आनंद -9822204677, अमेय - 9561098052 , शौनक - 7447786105 , मनमीत - 7744018785 या 4 क्रमांकावर आपली बिले, आपली रसिद आणि अप्लिकेशन पाठवावे. नागरिकांनी त्यांच्या समस्या लिखित स्वरूपात बिलांसहीत आणाव्या, त्याचे निरसन करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संदीप जोशींनी सांगितले.
हेही वाचा - ठाण्याच्या १०२ वर्षांच्या आज्जीची कोरोनावर मात, तरुणांना दिला 'हा' कानमंत्र