नागपूर - जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. यातच नागपूर जिल्ह्यातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मंगळवारी नागपूर शहरात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 691 हे नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. सोमवारच्या तुलनेत 19 रुग्ण कमी होते.
कोरोनाची परिस्थिती...कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवायला सुरुवात झाली आहे. यात नागपूरच्या शहरी भागात 5, ग्रामीण भागात 1 तर, बाहेर जिल्ह्यातील 2 असे 8 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत 4291 जणांचा नागपुरात मृत्यू झाल्याची नोंद आहे. नागपूर जिल्ह्यात 6468 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. यात तेच ग्रामीण भागात 1178 रुग्ण तर नागपूर शहरात 5290 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
कोरोनाच्या रुग्ण संख्येत भर सुरूच कोरोना चाचणी मोहीम सुरू...मंगळवारी शहरी भागात 551 रुग्णाची नोंद झाली आहे. तर ग्रामीण भागामध्ये नवीन 138 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. यात खासगी 18 ठिकाणी तर मनपाच्यावतीने जवळपास 50 लॅबमध्ये कोरोनाची चाचणी केली जात आहे. यात प्रत्येक ठिकाणी दररोज सरासरी 100 जणांची चाचणी केली जात आहे.
खबरदारी म्हणून पोलिसांच्याही चाचण्या-कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करत असतना पोलिसांना रस्त्यावरून उतरून काम करावे लागते. अशा परिस्थितीत कोरोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मनपा प्रशासनाच्या वतीने फिरत्या वाहनाच्या साह्याने पोलीस स्टेशनच्या आवारात जाऊन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणी करून घेण्यात आल्या आहेत.
मनपाकडून कारवाई-मनपाच्या वतीने मास्क न घालणारे नागरीक, सामाजिक अंतर न ठेवता नियम भंग करणारे ठिकाणी शोधून दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात शहरातील 10 झोनमध्ये मोहीम राबवण्यात आली. यामाध्यमातून जवळपास 1लाख 82 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात एकाच वेळी 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याने परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.