नागपूर - आजपासून (28 जानेवारी) 'राष्ट्रवादी परिवार संवाद' दौऱ्याला विदर्भातील नक्षलग्रस्त जिल्ह्यातून सुरुवात होणार आहे. हा संवाद दौरा गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथून सुरू होणार आहे. 3 हजार किलोमीटरचा दौरा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी दिली.
विदर्भाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होते?
राष्ट्रवादी पार्टी नेहमी विदर्भाकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका होते. यामुळे यावेळी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा विदर्भाच्या जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात जाणार आहे. त्या भागातील कार्यकर्त्यांचे प्रश्न ,जनतेच्या अपेक्षा हे जाणून घेणे तसेच पक्ष कुठे कमी पडतोय यादृष्टीने दौऱ्याच्या माध्यमातून आत्मचिंतन केले जाणार असल्याचे कुंटे पाटील यांनी सांगितले.
दौऱ्यात जलसंपदा विभागाचे मंत्री म्हणून जयंत पाटील शासकीय बैठक घेतील
हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातुन परिवार संवाद दौरा असणार आहे. शिवाय त्या जिल्ह्यात जातील त्या जिल्ह्यात जलसंपदा विभागाची शासकीय बैठक जयंत पाटील घेणार आहेत. त्या विभागासंदर्भातील शेतकऱ्यांचे सिंचनाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतील, अशी माहिती प्रवीण कुंटे पाटील यांनी दिली.
दौऱ्यात या जिल्ह्यांचा समावेश
या राष्ट्रवादी परिसंवाद दौऱ्यात विदर्भ, खानदेशमधील 14 जिल्हे, 82 मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. 135 कार्यकर्त्यांच्या बैठका आणि 10 जाहीर सभा होणार आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, आणि नंदुरबार जिल्ह्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दौरा असणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित महाराष्ट्राच्या भागात हा दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून येत्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, तसेच पक्ष मजबुती, पक्षांची परिस्थिती अशा विषयांना घेऊन हा दौरा केला जाणार आहे. तसेच विदर्भात पक्षाची ताकद वाढावी या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा समजला जात असल्याचे बोलले जात आहे.