नागपूर - धावत्या मेट्रो रेल्वेत जुगार खेळणे आणि अश्लील नृत्याचे आयोजन करून थिल्लरपणा केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार आणि सहकाऱ्यांविरुद्ध अखेर सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात महामेट्रोकडून तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पोलीस आता कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागपूरची शान म्हणून मिरवणाऱ्या 'माझी मेट्रो'मध्ये चक्क जुगार खेळला जात असल्याचा धक्कादायक घटना २० जानेवारीला घडली होती. हजारो कोटी रुपये खर्च केल्यानंतर सुमारे दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मेट्रोला प्रवासी मिळत नसल्याने मेट्रोकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, मेट्रोच्या या योजनांचा गैरफायदा घेऊन प्रशांत पवार आणि त्यांच्या समर्थकांनी अतिशय थिल्लरपणा केल्याने समाजातून संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
घडलेल्या घटनेची माहिती
धावत्या मेट्रोत केवळ तीन हजार रुपये खर्च करून कुणाला ही वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस यासह अनेक कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिली जाते. असाच एक कार्यक्रम २० जानेवारी रोजी संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अक्षरशः क्लब भरवण्यात आला होता. वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आलेल्या लोकांनी चक्क जुगार खेळला असल्याचे व्हिडिओ बाहेर आले होते. एवढेच काय तर आयोजकांनी तृतीयपंथीयांकडून नृत्यदेखील करवून घेतले होते. लोकांनी अक्षरशः नृत्यावर पैसे उडविले होते.