नागपूर - शरद पवार यांच्या मार्गदर्शनात आणि मुख्यमंत्री उद्धव नेतृत्वात सरकारचे काम अगदी व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे इतरांना महत्त्व देण्याची काय गरज, असा प्रश्न करत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल (praful patel) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांना टोला लगावला आहे. नागपूर विमानतळावर पत्रकारांशी ते बोलत होते.
हेही वाचा - शरद पवार हे महाविकास आघाडीचे रिमोट कंट्रोल - नाना पटोले
नाव न घेता टीका
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच्या संदर्भात वक्तव्य करत आहेत. एवढेच नाही तर नाना पटोले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर हेरगिरीचा आरोप केल्याने राज्याच्या राजकारणात वादळ आले होते. नानांचे वक्तव्य महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण करणारे ठरेल, असे राजकीय विश्लेषकांना वाटू लागले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांना विचारणा केली असता, त्यांनी नाना पटोले यांचे नाव न घेता आपली प्रतिक्रिया दिली आहे. रोज कोण, काय बोलतो, त्याला उत्तर देणेदेखील आम्हाला योग्य वाटत नसल्याचे पटेल म्हणाले आहेत.
'कन्सल्टंट म्हणून ते कुठेही जाऊ शकतात'
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तिवात आहे. महाविकास आघाडीचे जनक शरद पवार (sharad pawar) आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात सरकार आहे. त्यांच्याच नेतृत्त्वात सरकारचे काम अगदी व्यवस्थित सुरू आहे. नानांचे वक्तव्य म्हणजे एका प्रकारचा मीडिया इव्हेंट झाल्याची टीका त्यांनी नाव न घेता केली आहे. दिल्लीतील पावसाळी अधिवेशनात महागाई, शेतकऱ्यांचा प्रश्न, कोरोना, चीनच्या सीमेवर काय चालले आहे, या मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले आहेत. प्रशांत किशोर (prashant kishor) कन्सल्टंट म्हणून काम करतात, कन्सल्टंट म्हणून ते कुठेही जाऊ शकतात. ते कुणालाही भेटू शकतात. एका ठराविक व्यक्तीमुळे राजकारणाची दिशा ठरत नाही, असे ते म्हणाले.
हेही वाचा - महाविकास आघाडीत नुरा कुस्ती
'भेटीचा वेगळा अर्थ नको'
स्वबळाबाबत ज्यांच्या पक्षाला जे करायचे ते त्यांनी करावे, कुणालाही बांधून ठेवलेले नाही. काँग्रेस पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील (h k patil) जे बोलतात त्याला जास्त वजन असते. त्यामुळे मी त्यालाच जास्त महत्त्व देतो. ते थेट हायकमांडचे प्रतिनिधी म्हणून बोलतात. शरद पवार आणि उद्धव ठाकरे अधून-मधून भेटत असतात. त्यामुळे त्यांच्या भेटीचा वेगळा अर्थ काढायची गरज नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.