नागपूर - देशात महागाई आणि बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. मात्र, याकडे केंद्र सरकारचे कुठलेही लक्ष नसल्याचा आरोप करत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपुरातील शेकडो कार्यकर्त्यांनी रामनगर येथील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण आणि सुंदरपाठ वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. ( NCP Hanuman Chalisa reading agitation in Nagpur )
कडक पोलीस बंदोबस्त - एकीकडे केंद्र सरकारच्या धोरणांना तीव्र विरोध दर्शवण्यासाठीचे भोंग्याच्या माध्यमातून हनुमान चालीसाच्या माध्यमातून सरकारला सद्बुद्धी मिळावी या करिता हे आंदोलन करत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्ष दूनेश्वर पेठे यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या हनुमान चालीसा पठणाच्या कार्यक्रमाचा काउंटर करण्याकरीता राष्ट्रवादी कडून अशा प्रकारचा आंदोलन होत असल्याचा आरोप होत आहे. कडेकोट पोलिसांच्या बंदोबस्तात राष्ट्रवादीकडून हनुमान चालीसा वाचण्यात आली आहे.
हनुमान चालीसा पठणाचा वाद - राज्यात हनुमान चालीसा पठणावरून मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झालेले आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी देखील आज नागपुरात हनुमान चालीसेचे पठण केले आहे. देशात विविध प्रश्न असून हिंदूत्वाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात राजकारणात चर्चिला जात आहे. यावरूनच हनुमान चालीसा पठण हा मुद्दासमोर आला होता. राज ठाकरे यांनी प्रथम आपल्या गुढीपाडव्याच्या सभेत मशिदीवरील भोंगे हटवा अन्यथा मशिदीसमोर भोंग्यावर हनुमान चालीसाचे पठण करु असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यात मनसे कार्यकर्त्यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात आंदोलने केली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री घरासमोर हनुमान चालीसा पठणासाठी आंदोलन केले होते. यावरुन राज्यात मोठे आंदोलन उभारले होते. यावरुन शिवसेना विरुद्ध नवनीत राणा असा मोठा वाद उभा राहिला होता. त्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांना तुरुंगातही जावे लागले होते. दरम्यान ते दिल्ली येथून पुन्हा महाराष्ट्रात आल्यावर आज त्यांनी नागपुरात हनुमान चालीसा पठण केले आहे.