नागपूर - बँक ऑफ महाराष्ट्रसह इतर ही काही बँकांची आणि अनेक गरीब टॅक्सी चालकांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी गुलाम अश्रफी याला नागपूर पोलिसांनी काल ( मंगळवारी ) रात्री अटक केली आहे. गुलाम अश्रफी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता ( NCP activist arrested in Nagpur ) असून अवघ्या दोन महिन्याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( NCP State President Jayant Patil ) यांनी अल्पसंख्यांक समाजाचा तरुण चेहरा म्हणून त्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला होता.
पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गुलाम अश्रफीने त्याच्या यंग फोर्स या संघटनेच्या माध्यमातून शेकडो गरीब टॅक्सी मालक तसेच इतर वाहन मालकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. गुलाम अश्रफी गरीब वाहनचालकांना बँकेतून कर्ज घेऊन महागडे वाहन खरेदी करायला लावायचा आणि जेव्हा ते गरीब टॅक्सी चालक बँकेचे हफ्ते भरण्यास अपयशी ठरायचे. तेव्हा सुरुवातीला त्यांना बँकेच्या वसुली पथकाच्या कारवाईपासून संरक्षण द्यायचा, आणि नंतर स्वतः बँकेसोबत सेटलमेंट करून हस्ते थकल्यामुळे जप्त झालेले वाहन लिलावात कवडीमोल भावात स्वतः खरेदी करायचा. याच पद्धतीने गुलाम अश्रफीने अनेक ट्रक्स, जेसीबी, फॉर्च्युनर सारख्या महागड्या गाड्या आणि अनेक मालवाहतूक वाहन आपल्या नावावर करून घेतल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे गुलाम अश्रफी विरोधात यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे नागपूरच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यामध्ये मारहाण करणे, धमकावणे, खंडणी वसूल करणे, दंगल करणे यासह हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा ही दाखल आहे.
बँकेची फसवणूक करत घेतले कर्ज : गुलाम अश्रफीने स्वतःला कोळशा विभागाच्या अंतर्गत काम करणाऱ्या वेस्टर्न कोल फिल्ड्स कंपनीचा अधिकारी सांगत खोट्या सॅलरी स्लिप आणि इतर कागदपत्रे तयार करून बँक ऑफ महाराष्ट्रातून एकदा एक कोटी रुपयांचा तर दुसऱ्यांदा नव्वद लाख रुपयांचा कर्जही घेतले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र आणि इतर काही वित्तीय संस्थांनी त्याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर सखोल तपास करून पोलिसांनी काल रात्री गुलाम अश्रफीला अटक केली आहे.
'फसवणूक झालेल्यांनी समोर यावे' : गुलाम अश्रफीने याने शेकडो वाहनचालकांची फसवणूक केली आहे. ज्यांची फसवणूक झाली असले त्यांनी निर्धास्तपणे पोलिसांकडे संपर्क साधावे आणि आपली तक्रार द्यावी, असे आव्हान पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी केले आहे.
हेही वाचा - Love Marriage Dispute : प्रेमविवाह करुन थाटला संसार, वडिलांनी जबरदस्तीने घरी आणल्याने तरुणीने संपवले जीवन