नागपूर - देशात परिवर्तन आणून केंद्रातील भाजपचे सरकार सत्तेतून घालवायचे असेल तर काँगेसचे सहकार्य घेऊनच एकत्र आले पाहिजे असे तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर (Telangana CM) यांनी मान्य केले आहे. त्यामुळे मी त्यांना हैदराबादला भेटायला जाणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले. तसेच भाजपला सत्तेतून घालवायचे असेल तर काँग्रेसला सहकार्य करा, असे आवाहनही नाना पटोलेंनी केले आहे.
नाना पटोले आज नागपुरातील सोमवारी पेठचे भाजपचे विद्यमान नगरसेवक सतिष होले यांच्या काँग्रेस पक्षप्रवेश सोहळ्यात बोलत होते. यावेळी मंचावर गर्दी झाल्याने स्टेजचा काही भाग खसला होता. त्यामुळे नाना पटोले यानी मंचावरून खाली येऊन सत्कार स्वीकारला.
- येत्या काळात अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश - नाना
तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे मुंबईत आले असताना त्यावेळी मी बाहेर असल्याने त्यांची भेट घेऊ शकलो नाही. काँग्रेस हा मूळ पक्ष असल्याचे राव यांनीही मान्य केले आहे. भाजपमधील अनेक लोकांचा काँग्रेस प्रवेश येत्या काळात पाहायला मिळेल. भाजपने चुकीच्या पद्धतीने लोकांना अडचणीत आणण्याची कामे केली आहेत. त्यामुळे लोक नाराज आहेत. याचे परिणाम म्हणून अनेक कार्यकर्ते काँग्रेसचा विचार स्वीकारून परत काँग्रेसमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे, असे नाना पटोले म्हणाले.
- आरोप कोण करते यापेक्षा किती तथ्य आहे हे समजणे गरजेचे-
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या मुलावर एका कुख्यात आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप लावण्यात आला. आजकाल डिजिटल पद्धतीने फोटो तयार होत असल्यामुळे सगळी परिस्थिती पाहूनच त्यावर प्रतिक्रिया देता येईल, असे नाना पटोले म्हणाले. आरोप कोणीही काहीही लावू शकतो, पण त्या आरोपात खरच किती तथ्य आहे हे समजणे गरजेचे आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर लावलेल्या आरोपांबद्दल सविस्तर माहिती नसल्याने त्यावर बोलणे योग्य नाही. भाजप महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम करत आहे, असे नाना पटोले म्हणाले.
- एसटी कामगारांना न्याय मिळावा-
एसटी कामगारांना भाजपने उचकवले होते, नंतर मात्र त्यांची साथ सोडली. आज त्यांच्या परिवारांची वाईट अवस्था आहे. यावर सकारात्मक तोडगा काढला पाहिजे अशी काँग्रेसची भूमिका असून मुख्यमंत्र्यांना तसे चर्चेत सांगितले असल्याचे नाना पटोले म्हणाले.
- पक्ष प्रवेशानंतर महिलांना वाटले टोकण-
प्रक्ष प्रवेश सोहळ्यासाठी अनेक महिलांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. पण यावेळी कार्यक्रम पार पडल्यानंतर महिलांना टोकण वाटप करण्यात आले. हे टोकण नाश्त्याचे आहे असे आयोजक मंडळींकडून सांगितले जात असले तरी यात शंकेला वाव आहे.