नागपूर - विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामुळे सभागृहात गोंधळ झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी राष्ट्रावादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संपूर्ण महाराष्ट्राला भारतीय जनता पक्षाची अपरिपक्वता दिसत असल्याचा टोला लगावला आहे.
हेही वाचा... 'अच्छे दिन'बद्दल विचारल्यावर तुमची बोबडी का वळते? ; युती तुटली म्हणजे आम्ही धर्मांतर केले नाही
शेतकऱ्यांना मदतीच्या नावाने भाजप राजकारण करत आहे - जितेंद्र आव्हाड
शिवसेना आमदार नितीन देशमुख आणि भाजपचे आमदार हरिश पिंपळे यांच्यात आज सभागृहात हमरीतुमरी झाली, यावरून जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर टीका केली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला भारतीय जनता पक्षाची अपरिपक्वता दिसत आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येऊन काहीच दिवस झाले असताना यांना पाच वर्ष झाल्याचा भास होत आहे, अशी वागणूक भाजप करत असल्याचे ते म्हणाले आहेत.
पाच वर्षात भाजप सरकारने सरकारची घडी विस्कळीत केल्याचा आरोप सुद्धा आव्हाड यांनी केला आहे. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या भाजप सरकारच्या काळात झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीच्या नावाने भाजप राजकारण करत आहे, अशी टीका भाजपने केली आहे. सभागृहात सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा आहे, मात्र भाजपचे आमदार अंगावर येत असल्याचे आव्हाड म्हणाले.
हेही वाचा... नगराध्यक्ष अन् सरपंच जनतेतून थेट निवडण्याची पद्धत होणार रद्द..
अपवित्र युती करून तुम्हीच सत्तेत - अतुल भातखळकर
जितेंद्र आव्हाड यांचे मुद्दे खोडून काढताना भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवरच निशाना साधला. शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत दिली जाणार नाही, तोवर शेवटच्या टोकापर्यंत आपण संघर्ष करू. अपवित्र युती करून तुम्हीच सत्तेत आला आहात, असे भातखळकर यावेळी म्हणाले.
हेही वाचा... राज्य सरकार ५० दिवस तरी टिकणार का? रामदास आठवलेंचा उपरोधिक प्रश्न