नागपूर - नागपूरात उमरेड मार्गावरील उमरगाव फाट्याजवळ ट्रक आणि टवेरा कारमध्ये भीषण अपघात झाला ( Nagpur Umred Road Accident ) आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. तसेच, अपघातात एक छोटा मुलगा गंभीर झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले ( Umred Road Accident Seven People dead ) आहे. घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.
या अपघातात मृत झालेले सातजण हे नागपूरमधील बेझनबागच्या लुम्बीनी नगरचे रहिवासी असून, ते एकमेकांचे नातेवाईक होते. अश्विन गेडाम, स्नेहा भुजाडे, आशिष भुजाडे, सागर शेंडे, नरेश डोंगरे, पद्माकर भालेराव, मेघना पाटील अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक स्नेहा भुजाडे यांच्या भावासाठी मुलगी बघण्यासाठी सर्व उमरेड येथे गेले होते. तिथून घरी परत येताना त्यांच्यावर काळाने झडप घातली आहे. या अपघातात एक लहान मुलगा बचावला आहे. तो गंभीर जखमी असल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त टवेरा कारचा वेग मर्यादेपेक्षा जास्त होता. ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे. टवेराकार उमरेड कडून नागपूरच्या दिशेने जात होती. तेव्हाच उमरगाव फाट्याजवळ टवेरा कारच्या चालकाने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, टवेराचा वेग जास्त असल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. आणि टवेरा ट्रकच्या मागच्या बाजूला जाऊन आदळली. या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
घटनास्थळ हे उमरेड मार्गावर असल्याने कुही आणि उमरेड ठाण्याचे पोलीस कर्माचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, घटनास्थळ हे हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने त्यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर हुडकेश्वर पोलीस ठाण्यात स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.
हेही वाचा - blast at Tata Steel : जमशेदपूरच्या टाटा स्टील प्लांटमध्ये भीषण स्फोट; पाच ते सात जखमी