नागपूर - एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर वाहिनीच्या कार्यक्रमातून वारंवार आरोप करण्यात आले. यावरून नागपूर शिवसेनेने निदर्शने केली. चितार ओळ परिसरात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी गोस्वामी यांचे गाढवावर प्रतिकात्मक फोटो लावत त्यांच्या वृत्तवाहिनीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी यावेळी शिवसेनेतर्फे करण्यात आली.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून गोस्वामी यांनी मुंबई पोलिसांवर आरोप केले. त्यामुळे गोस्वामी व त्यांच्या वृत्तवाहिनीवर प्रतिबंध लावण्यात यावा. या मागणीसाठी शिवसेनेकडून निदर्शन करण्यात आले. अर्णब गोस्वामी हे कार्यक्रम घेऊन मुंबई पोलिसांची बदनामी करत असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले. शिवसेनेकडून गोस्वामी यांचा गाढवावर प्रतिकात्मक फोटो लावून मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.
मुंबई पोलीस हे उत्तम काम करत आहे. त्यांची जगातील पोलिसांबरोबर तुलना केली जाते. मात्र अर्णब गोस्वामी त्यांच्या वृत्तवाहिनीवरून वारंवार मुंबई पोलिसांची बदनामी होते. त्याचा विरोध करत असल्याचे शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष सतीश हरडे यांनी सांगितले. यामुळे त्यांच्या वृत्तवाहिनीवर प्रतिबंध लावण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
मुंबई पोलिसांचा अपमान करणे तत्काळ थांबवले पाहिजे. सुशांतसिंह हे उत्तम कलाकार होते. त्यांच्या मृत्यूचे गूढ नक्कीच उलगडायला हवे. मात्र मुंबई पोलिसांवर बिनबुडाचे आरोप करणे थांबवायला हवे, असे हरडे म्हणाले. अर्णब गोस्वामी यांची वृत्तवाहिनी कोणीही बघू नये, असे आवाहन त्यांनी केले. आंदोलनादरम्यान 'मी मुंबई पोलीस समर्थक' असे फलक ही झळकवण्यात आले. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस व मुंबई पोलिसांच्या कामाबद्दल अभिमान असल्याचे सांगत महाराष्ट्र जिंदाबादच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या.