नागपूर - नागपुरात चोरीच्या प्रकरणाचा निकाल तब्बल 42 वर्षांनी लागला. यात विशेष म्हणजे 42 रुपये लुटल्याच्या घटनेत चार पैकी 3 आरोपींचा मृत्यू झाला असून चौथ्या आरोपीची निर्दोष सुटका झाली. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला असून यात सुटका झालेल्या भीमराव नितनवरे यांनी सुद्धा वयाची पासष्ठी ओलांडली आहे.
भीमराव नितनवरे आणि त्याचे तीन सहकारी यांच्यावर 13 जानेवारी 1978 ला एका व्यक्तीला चाकू दाखवून लुटले असल्याचा गुन्हा दाखल झाला होता. नागपूर हिंगणा रोडवर मोतीराम गेडाम नामक व्यक्ती जात होते. त्यावेळी रात्रीच्या वेळेस भीमराव आणि रमेश मेश्राम, मधुकर पाटील आणि हिरामण ढोके या चौघांनी मोतीराम यांना चाकू दाखवत भीती दाखवली व त्यांच्याकडील ऐवज मागितला. त्यावेळी त्यांनी खिशात असलेले 42 रुपये जिवाच्या भीतीपोटी काढून दिले. पण 1978 मध्ये 40 रुपये ही छोटी रक्कम नसल्याने त्यांनी पोलिसात तक्रार केली.
हे ही वाचा -एनसीबी पथकाकडून समीर वानखेडेंचा चार तास जवाब नोंदवला, मात्र तक्रारदार गायब
तीन आरोपींचा व पाच साक्षीदारांचा मृत्यू -
पोलिसांनी त्या प्रकरणात मोतीराम यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीसांनी लुटीचा गुन्हा दाखल केला. त्यामध्ये भीमराव आणि सुरुवातीला रमेश मेश्राम यांना अटक झाली होती. मात्र तपास पूर्ण होण्यास विलंब झाल्याचा आरोप पत्र न्यायालयात दाखल होण्यास अनेक कारणांनी विलंब झाला. त्यानंतर प्रत्यक्षात खटल्याचे कामकाज सुरू होईपर्यंत चार आरोपीमधील रमेश मेश्राम, मधुकर पाटील आणि हिरामण ढोके यांचा कालांतराने मृत्यू झाला. या सोबतच सरकारी पक्षातील सात साक्षीदारांपैकी पाच साक्षीदार यांचाही मृत्यू झाला होता.
हे ही वाचा - पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन किरण गोसावी पसार.. महिला सहकाऱ्याला अटक
एकमेव जिवंत आरोपी निर्दोष -
या लुटीचे प्रकरण पुन्हा एकदा न्यायालयात सुनावणीसाठी आले. पण यात साक्षीदार आणि गुन्हेगार यांचा मृत्यू झालेला होता. त्यामुळे या गुन्ह्यात सादर केलेले पुरावे लक्षात घेऊन नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणातील चार आरोपींपैकी एकमेव जिवंत असलेल्या आरोपी भीमराव नितनवरे यांची लुटीच्या प्रकरणातून निर्दोष सुटका केली.
या गुन्ह्याचा ठपका लागल्याने भीमराव नीतनवरे यांना आपले आयुष्यातील उमेदीचा काळ या लुटीचा ठपका ठेवून जगावे लागले. या काळात त्यांनी सुरक्षा रक्षक म्हणून काम केल्याची माहिती पुढे आले आहे. पण न्यायदानाला झालेल्या विलंबाने नक्कीच त्यांचे आयुष्य चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी म्हणून 42 वर्ष गेले.