नागपूर - शहरातील एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या ३९ वर्षीय डॉक्टरने २५ वर्षीय सहकारी महिला डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी नंदू रहांगडाले नावाच्या डॉक्टरला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मेडीकेअर खासगी हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. या रुग्णालयात ३९ वर्षीय डॉक्टर नंदू रहांगडाले हा आधिपासूनच कामाला आहे. तर पीडित महिला डॉक्टर ही काही दिवसांपूर्वीच सेवेत रुजू झाली होती. दोन दिवसांपूर्वी पीडित महिलेची रात्रपाळी ड्युटी असताना आरोपी डॉक्टरने तिला चेंजिंग रूममध्ये बोलावून घेतले. कामानिमित्त डॉक्टरांनी बोलावले असले म्हणून ती पीडित महिला चेंजिंग रूममध्ये गेली असता, आरोपी डॉक्टरने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न सुरू केला, असा अरोप महिला डॉक्टरने केला आहे. अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेमुळे पीडिता प्रचंड घाबरली होती. तरी देखील तीव्र प्रतिकार करत तिने स्वतःची सुटका करून घेत स्वतःचे घर गाठले. घडलेल्या घटनेची माहिती घरच्यांना दिली. तेव्हा घरच्यांच्या मदतीने त्या पीडित महिला डॉक्टरने मानकापूर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी डॉक्टरविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी डॉक्टर नंदू रहांगडालेला अटक केली आहे.
आरोपी डॉक्टरला एका दिवसाची पोलीस कोठडी
पीडित महिला डॉक्टरने योग्य वेळी या घटनेची तक्रार मानकापूर पोलिस ठाण्यात दाखल केल्याने पोलिसांनी देखील तात्परता दाखवत आरोपी डॉक्टरला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे
हेही वाचा - लॉकडाऊन, मोफत लसीकरणावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय