नागपूर - कपिल बेन या तरुणाच्या खून प्रकरणात उद्याप कोणत्याही आरोपीला पोलीस अटक करू शकलेले नसल्याची माहिती समोर आली आहे. रात्रभर अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींचा शोध घेतला. मात्र, कुठेही आरोपी मिळून न आल्याने आता पोलिसांनी आरोपींच्या कुटुंबातील लोकांची चौकशी सुरू केली आहे. त्यांच्याकडून आरोपींच्या संदर्भात काही माहिती मिळते का याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.
रात्री उशिरा घडली घटना -
शुक्रवारी रात्री उशिरा नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लष्करीबाग परिसरात अठरा वर्षीय तरुण कपिल श्रीकांत बेनची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली होती. उमेश चिकाटे, कालु आणि भुऱ्या नावाच्या तीन आरोपींचा सहभाग कपिलच्या खून प्रकरणात निष्पन्न झाला आहे. मृत कपिल हा पाचपावली परिसरातील नोगा फॅक्टरी मोतीबाग येथे राहत होता. तो त्याचा मित्र अब्दुल सलीम अब्दुल सत्तारसोबत लष्करीबाग शितला माता मंदीर परिसरात खर्रा खात बसला असताना आरोपी उमेश चिकाटेंने कपीलला येथे का बसला, या कारणावरून भांडण सुरू केले. त्याचवेळी कालु भुरूने देखील कपिलला मारहाण केली. कपिल खाली कोसळताच तिघांपैकी एकाने कपीलचे डोके दगडने ठेचून त्याचा खून केला. घटनेनंतर तीनही आरोप पळून गेले आहेत.
आरोपींचा शोध सुरू -
घटनेची माहिती समजताच पाचपावली पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपींची नावे निष्पन्न केली. त्यानंतर आरोपींचा शोध देखील सुरू केला. मात्र, अद्याप एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मुलीच्या वादातून कपिलचा खूना झाला असल्याचे देखील बोलले जात आहे. आरोपींचा शोध अजूनपर्यंत न लागल्याने पोलिसांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.