नागपूर - कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना, शहरातील विकासकामांना मात्र गती मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. शहरातील महामेट्रोच्या माध्यमातून व्हायडव्क्ट, स्टेशन, आनंद टॉकीज येथील कॅटीलिव्हर पूल, गड्डीगोदाम गुरुद्वारा जवळ डबल डेकर उड्डाणपुलाचे निर्माण कार्य देखील जलद गतीने सुरू आहे. महा मेट्रोने नुकतेच रिच-२ मार्गिकेवरील (सिताबर्डी इंटरचेंज ते ऑटोमोटिव्ह चौक) मेट्रो स्टेशन दरम्यानच्या झिरो माईल ते कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रो ट्रेनचे यशस्वीरित्या ट्रायल पूर्ण करण्यात आले होते. डिसेंबर २०२१ पर्यंत रिच २ आणि रिच ४ मार्गिकेवर मेट्रो सेवा सुरू करण्याचा महा मेट्रोचा मानस असून निर्माण कार्य पूर्णत्वाच्या दिशेने अग्रणीय आहे. तसेच ऑरेंज आणि अॅक्वा लाईन मार्गिकेवरील सर्व स्टेशन आता प्रवासी सेवामध्ये उपलब्ध झाली आहेत.
![महा मेट्रोचे काम प्रगतीपथावर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ngp-03-nagpur-metro-work-7204462_19062021134259_1906f_1624090379_929.jpg)
![कामठी मार्गावरील मेट्रोचे काम प्रगतीपथावर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ngp-03-nagpur-metro-work-7204462_19062021134259_1906f_1624090379_816.jpg)
नागपूरचा सेन्ट्रल एव्हेन्यू परिसर व्यावसायिक स्वरूपाचा असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात आवागमन येथून होते. नागपूर शहराचा विस्तार होत असताना या मार्गवरील वाहतूक देखील सातत्याने वाढली. बाजारपेठ वाहतुकीच्या गर्दीमुळे प्रकल्प राबवताना मेट्रोने पुरेपूर काळजी घेतली आहे. या मार्गीकेवरील प्रवासी सेवा सुरू झाल्यावर मेयो हॉस्पिटल, रेल्वे स्थानक, क्वॉटन मार्केट, इतवारी बाजारपेठ इत्यादी ठिकाणी जाणे सोईस्कार ठरेल.
रिच-२ सिताबर्डी इंटरचेंज ते ऑटोमोटीव्ह चौक :-
रिच-२ (सिताबर्डी इंटरचेंज ते आटोमोटीव्ह चौक) कॉरीडोरचे गतीने सुरू असून आतापर्यंत ८५% व्हायाडक्टचे कार्य पूर्ण झाले आहे. ज्यामध्ये झिरो माईल ९९%,कस्तुरचंद पार्क ९५%,गड्डीगोदाम चौक ६०%,कडबी चौक ५५%,इंदोरा चौक ५०%,नारी रोड ७०% आणि ऑटोमोटीव्ह चौक ८०% मेट्रो स्टेशनचे निर्माण कार्य पूर्ण झाले आहे. तसेच या मार्गिकेवरील सिताबर्डी ते कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन पर्यंत ट्रॅक टाकण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. इंदोरा चौक ते नारी रोड दरम्यान देखील ट्रॅकचे टाकण्याचे कार्य सुरू आहेत.
![कामठी मार्गावरील मेट्रोचे काम प्रगतीपथावर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ngp-03-nagpur-metro-work-7204462_19062021134259_1906f_1624090379_732.jpg)
नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या रिच– २ अंतर्गत ४ स्तरीय संरचना असलेली परिवहन व्यवस्था आहे. गड्डीगोदाम क्रॉसिंग येथील संरचनेत ४ स्तरीय परिवहन व्यवस्था आहे. पहिल्या स्तरावर जमिनी मार्ग (विद्यमान आरयुबी मार्ग) रहदारी करीता असलेला रस्ता, दुसऱ्या स्तरावर रेल्वे ट्रॅक, निर्माण कार्य पूर्ण झाल्यावर तिसर्या आणि चौथ्या स्तरावर उड्डाणपूल आणि मेट्रो मार्गिका राहील.कामठी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. वाहनांची ये-जा येथून अविरत सुरुच असते. सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कॉलेज, व्यापारी संकुले,बँक,शासकीय कार्यालय रस्त्याच्या दोन्ही बाजूने आहेत. तसेच हा रस्ता उत्तर आणि दक्षिण नागपूरला जोडणारा प्रमुख रस्ता आहे.