नागपूर - शहराचे प्रथम नागरिक महापौर संदीप जोशी यांना कोरोनाची लागण झाले आहे. या संदर्भातील माहिती त्यांनी स्वतः ट्विटरवरून दिली आहे. शिवाय खबरदारी म्हणून स्वतः होम क्वारंटाइन झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार घेत आहेत. आपल्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःची कोव्हिड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
रुग्णसंख्या वाढती
गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे धोका अधिकच वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यापासून ते प्रशासकीय आणि राजकीय नेते मंडळींनादेखील गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता महापौर जोशींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पदवीधर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लागण झाल्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून ते विधानपरिषदेच्या पदवीधर निवडणुकीच्या माध्यमातून विविध ठिकाणी फिरत होते. विविध जिल्ह्यात जावून आपला प्रचार करत होते. यादरम्यान त्यांना लागण झाल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांनी नुकतीच चाचणी केली असता त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे स्वतः जोशी यांनी सांगितले आहे.
यापूर्वीही दोन वेळा होते होम आयसोलेट
यापूर्वीही दोन वेळा संदीप जोशी हे कोरोना रूग्णाच्या संपर्कात आले होते. त्यावेळी त्यांनी स्वतःला होम आयसोलेट केले होते. त्यानंतर काही दिवस ते आयसोलेटमध्येच होते. त्यामुळे तिसऱ्यांदा त्यांना होम आयसोलेट राहावे लागत आहे.
नागपुरातील 'या' अधिकाऱ्यांनाही झाली होती लागण
यापूर्वी मनपाचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे सर्व खबरदारी घेऊनदेखील या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला होता. अशावेळी सामान्य नागरिकांनीदेखील अधिक काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे.