नागपूर - नियमांचे पालन होत नसल्याने नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापौर संदीप जोशी हे सोमवारी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी वेगवेगळे दौरे करत अनेक दुकानदारांवर केली कारवाई केली. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली याचा अर्थ नियम पाळायचे नाही, असा होत नसल्याचे दाखवत. त्यांनी शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करा, नियम पाळा, अन्यथा मोठी कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. दोघांनीही एकमेकांसोबत दौरा करणे टाळत शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये जाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील विविधता बाजारपेठांचा अचानक दौरा केला. झाशी राणी चौक ते आनंद टॉकीज दरम्यानच्या रस्त्यावरील बाजारामध्ये नियमांचे पालन होत आहे की नाही, याची त्यांनी शहानिशा केली. नियम मोडणाऱ्या दुकानांमध्ये स्वत: जाऊन दुकानदारांची कानउघाडणी केली. ज्या दुकानांतील कर्मचारी अथवा येणारा ग्राहक मास्कचा वापर करताना आढळला नाही, त्यांच्यावर दंड आकारण्याचे निर्देश दिले. त्यानंतर मनपाच्या अधिकाऱ्यांनी अशा नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर तत्काळ दंडात्मक कारवाई केली.
हेही वाचा - 'उद्या दूध दरवाढ विषयावर नियोजित बैठक म्हणून भाजपाने आजच आंदोलन उरकले'
त्यानंतर बर्डी, कॉटन मार्केट परिसर, सुभाष रोड, चिटणवीस पार्क, शिवाजी पुतळा ते गांधीसागरदरम्यानच्या मार्गावरील बाजारात फिरून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. या मार्गावर मोठ्या प्रमाणात हॉकर्स फुटपाथवर बसलेले आढळले. हॉकर्सला सध्या दुकान थाटण्याची परवानगी नसतानाही ते कसे काय दुकान थाटून बसले, याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. अशा हॉकर्सवरही यावेळी कारवाई करण्यात आली.
'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत लॉकडाऊनमध्ये दिलेली शिथिलता ही नागरिकांच्या भल्यासाठी आणि दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू रहावे, यासाठी आहे. मात्र, हे करताना शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करणेही आवश्यक आहे. तसे होत नसल्याचे वाढत्या रुग्णसंख्येवरून लक्षात येत आहे. नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करावे अन्यथा नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. तर, दुसरीकडे महापौर संदीप जोशी देखील रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर 'ऑन दी स्पॉट' दंड आकारला आहे.
महापौर संदीप जोशी यांनी बाजार परिसरातील व्यापारी आणि ग्राहकांनी नियम पाळावे, यासाठी लक्ष्मीनगर झोनअंतर्गत असलेल्या बाजारांचा पायी दौरा केला. गोपालनगर, प्रतापनगर, खामला, देवनगर आदी भागात फिरून कोविड-१९ संदर्भात शासनाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करण्याचे आवाहन केले. महापौरांच्या या जनजागृती दौऱ्यात गोपालनगर, प्रतापनगर परिसरात काही दुकाने सम-विषम नियमांचे उल्लंघन करताना आढळले. त्या दुकानदारांना तिथल्या तिथेच दंड आकारण्याचे निर्देश दिले. त्यांच्या निर्देशावरून पालिकेच्या उपद्रव शोध पथकाने दंडाची कारवाई केली आहे.
हेही वाचा - ग्रामपंचायत प्रशासक नेमणुकीच्या नवीन पद्धतीला अण्णांचा विरोध