नागपूर - शहरात आणि जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नवीन कोविड केअर सेंटर तयार केले जात आहेत. त्या ठिकाणी खासगी डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असतानाही अनेक सेंटरवर नियुक्ती करण्यात आलेले कर्मचारी हजर झालेले नाहीत अशा तक्रारी वाढल्या आहेत, त्यामुळे आता अशा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे. अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी पोलीस विभागाकडे देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
'अतिरिक्त बेड्स वाढवले जाणार'
शहरात-जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या ४१ हजारांच्या घरात गेली आहे. त्यामुळे शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. आता नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात शंभर अतिरिक्त बेड्स वाढवले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री यांनी दिली आहे. ऑक्सिजनच्या बाबतीत आम्ही राज्य सरकारशी संवाद साधलेला आहे, त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता होणार नाही, असे ते म्हणाले आहेत.
'नवे लसीकरण केंद्र सुरू करणार'
नागपूर जिल्ह्यातील मौदा आणि रामटेक या ठिकाणी नव्याने कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बुटीबोरी आणि टाकळघाटला लसीकरण केंद्र सुरू करणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. डब्ल्यूसीएल आणि मोइल खान परिसरातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण आणि चाचण्या करण्याच्या संदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. आता यापुढे सरकारी रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाचे लसीकरण केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.