नागपूर - दिवाळीच्या सणातही नफेखोरांनी सर्वसामान्यांच्या आरोग्याला हानीकारक अशी अन्नपदार्थामधील भेसळ सुरुच ठेवली आहे. दिवाळीत सर्वाधिक मागणी मिठाईची असताना खव्यात भेसळ सुरू असल्याचे समोर आले आहे. बर्फीमध्ये भेसळ करणाऱ्या मिठाईच्या कारखान्यावर नागपूरच्या अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभागाने धाड टाकली. या कारवाईतून दोन्ही विभागाने १ लाख १९ हजार रुपयांची ५५३ किलो बर्फी जप्त केली आहे.
नागपूर शहरालगत असलेल्या वाडी नगरपरिषदे अंतर्गत येणाऱ्या लावा गावात भाड्याच्या घरात अवैध मिठाई कारखाना सुरू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्या सूचनेवरून विभागाने लावा गावातील या कारखान्यावर धाड टाकली. त्यावेळी ४२ वर्षीय मेघराज राजपुरोहित नावाच्या व्यक्तीने हा कारखाना गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू केल्याची माहिती दिली आहे. त्यांच्याकडे मिठाई निर्मितीचा कुठलाही परवाना नव्हता.
सॅफोलाइट हा घातक रासायनिक पदार्थही आढळला!
दूध पावडर, तयार बर्फी व सॅफोलाइट (Safolite) नावाचा ४०० ग्रॅम रासायनिक पदार्थदेखील आढळून आले आहेत. सॅफोलाईट हा पदार्थ आरोग्याला घातक आहे. तो भट्टी स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे राजपुरोहित याने सांगितले. परंतु हा रासायनिक पदार्थ मिठाईमध्ये वापरत असल्याचा अन्न व औषध विभागाला संशय आहे. पोलीस आणि अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी तयार बर्फी व इतर साहित्याचे नमुने प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले. तर सुमारे १ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दिवाळीच्या आनंदात विष कालवण्याचा प्रकार -
दिवाळीच्या निमित्ताने मिठाईच्या मागणीत प्रचंड वाढ होते. ग्राहकसुद्धा पुजेच्या प्रसादाकरिता आणि स्नेह भेट म्हणून दुकानात तयार झालेल्या मिठाईंना प्राधान्य देत असतात. या संधीचा गैरफायदा घेऊन भेसळ करणारे आरोपी दरवर्षी दिवाळीच्या आधी भेसळयुक्त खवा बाजारात विक्रीकरिता आणतात. ज्या ग्राहकांना खव्याची ओळख नसते, ते ग्राहक बनावट खवा विकत घेतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. ग्राहकांनी खात्री पटल्याशिवाय खवा खरेदी करू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
एफडीएकडून खास दिवाळीदरम्यान विशेष तपासणी मोहीम -
अन्न पदार्थ भेसळीला रोखण्यासाठी व भेसळखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी दरवर्षी एफडीएकडून खास दिवाळीदरम्यान विशेष तपासणी मोहीम राबवली जाते. एफडीएने एका आठवड्यातराज्यात तब्बल सव्वा चार कोटी रुपयांचे भेसळीच्या अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे. यात १२ टन खवा, ३,५६१ किलो मिठाई, ४६ हजार किलो रवा-मैदा-तेल-तूप तर ४० हजार ६३८ किलो इतर अन्न पदार्थांचा समावेश आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी सुरक्षित साजरी करण्यासाठी खरेदी करताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.