नागपूर - भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. १२ वर्षांपूर्वी भाजपने शिवसेनेच्या मदतीने नागपुरात भगवा फडकवला होता. मात्र आता राज्यात ज्याप्रमाणे महाविकासआघाडीने सत्तापालट केली, त्याचप्रमाणे नागपूर जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेने भाजपला धोबीपछाड दिले आहे.
या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसला 30, राष्ट्रवादीला 10, तर भाजपला 15 जागांवर यश मिळाले. शिवसेना आणि शेकापला मात्र प्रत्येकी एकाच जागेवर यश मिळाले. तर, एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली आहे. एकूण आकडेवारी पाहता, काँग्रेसला नागपूरमध्ये एकहाती सत्ता मिळाल्याचे दिसून येत आहे. मागील साडेसात वर्षांपासून नागपूरमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला राज्यासोबतच नागपूरमधूनही पायउतार व्हावे लागले आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप नेते देवेंद्र फडवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना मोठा धक्का बसला आहे.
भाजपच्या या दारूण पराभवामागची काय कारणे असू शकतात, याबाबत 'ईटीव्ही भारत'ने राजकीय विश्लेषक प्रदीम मैत्र यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांच्या मते, पुढील कारणांमुळे नागपूरात भाजपचा सुपडा साफ झाला आहे..
नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकरी वर्ग मोठया प्रमाणात आहे. तर, भाजपचे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे दोनही नेते शहरी भागातील राजकारणी आहेत. ग्रामीण भागात या दिग्गजांची पकड फारशी मजबूत नाही. तर दुसरीकडे, ग्रामीण भागातील ओबीसी समाजाचा चेहरा असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभेत नाकारल्यामुळे ग्रामीण कार्यकर्त्यांमधील नाराजी अद्यापही कायम होती. सोबतच राज्यातील सत्तापालट झाल्याने भाजप कार्यकर्ते निरुत्साही होते.
जिल्हयातील शेतकरी बहुल भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पकड ही पारंपरिक आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत ६ पैकी केवळ २ जागा भाजपला मिळाल्या होत्या. तसेच, सावनेर भागात सुनील केदारांची मजबूत पकड आहे. २०१४ च्या 'मोदी' लाटेत देखील सावनेर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस विजयी राहिले होते. काटोल भागात अनिल देशमुखांची पकड पारंपरिक आहे. सत्तेत नसताना देखील वारंवार शेतकऱ्यांचे प्रश्न, चौराई धरणाचा प्रश्न, पिकांना योग्य हमी भाव आणि विकास या मुद्द्यांना कॉंग्रेस-राष्ट्रवादीने पुढे आणले होते. सत्तासंघर्षाच्या वेळी शरद पवारांनी राजकीय भूकंपादरम्यानही राज्यातील ओल्या दुष्काळाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याचाच परिणाम ग्रामीण जनतेच्या मतपरिवर्तनात झाला, असे मैत्र यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : नागपूर जिल्हा परिषद निकाल : बालेकिल्ल्यात भाजपला जोरदार धक्का, काँग्रेस-राष्ट्रवादीची मुसंडी