नागपूर - शहराची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. याच नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी बऱ्याच प्रमाणात 'अनफिट' असल्याचे समोर आले आहे. पोलीस दलाच्या रुग्णालयातील पोलिसांच्या केलेल्या आरोग्य चाचणीतून ही बाब समोर आली.
हेही वाचा... 'कँडीक्रश'चा खेळ भोवला, सहकार आयुक्त निलंबित
गेल्या काही वर्षांत 'क्राईम सिटी' म्हणून नागपूर शहराचा उल्लेख केला जातो आहे. नागपुरात गुन्हेगारांना वेसण घालून गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्याची जबाबदारी नागपूर पोलिसांवर आहे. याच नागपूर पोलिसांची गुन्हे शाखा मात्र बऱ्याच प्रमाणात आजारी असल्याचे समोर आले आहे. खुद्द पोलीस रुग्णालयाने केलेल्या आरोग्य विषयक चाचणीत गुन्हे शाखेचे १० टक्के पोलीस पूर्णपणे अनफिट असल्याचे समोर आले आहे. तर इतर ७ ते ८ टक्के कर्मचारी अनफिट श्रेणीच्या उंबरठ्यावर ( बी आणि सी श्रेणीत ) असल्याचे आढळले आहेत.
हेही वाचा... एक 'नकोशी' नाल्यात, तर दुसरीला फेकले रेल्वे रुळावर
पोलीस रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर्सच्या देखरेखीत नुकतेच गुन्हे शाखेतील २१५ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची आरोग्य चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये किरकोळ आरोग्य विषयक समस्या असलेले १७० कर्मचारी तर फिट श्रेणीत ( ए श्रेणी ) उत्तीर्ण झाले. मात्र, १० टक्के कर्मचाऱ्यांना गंभीर स्वरुपातील रक्तदाब, मधुमेह आणि हृदय विषयक विकार असल्याचे निष्पन्न झाले. त्या सर्वांना 'सी श्रेणी'त ठेवण्यात आले आहे. इतर ७ ते ८ टक्के पोलीस देखील याच आजारांच्या उंबरठ्यावर असल्याचे समोर आले आहे. त्या सर्वांना 'बी श्रेणी'त ठेवण्यात आले आहे. अशा सर्व कर्मचाऱ्यांवर आता विशेष लक्ष ठेऊन त्यांच्या आरोग्याची खास काळजी घेतली जाणार असल्याचेही रुग्णालय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा...कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण: सागर खोतवर गुन्हा दाखल करा
पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत असल्यास त्यांनी पोलीस रुग्णालयातील डॉक्टर्सला किंवा आपल्या वरिष्ठांना सांगावे, असे पोलीस कर्मचाऱ्यांना सांगण्यात येणार आहे. नागपूर शहर पोलीस दलातील १६ कर्मचारी गेल्या काही महिन्यात काम करताना मृत्युमुखी पडले. त्यानंतर नागपूर पोलिसांनी सर्व ८ हजार ७०० पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची आरोग्य चाचणी घेण्याचे ठरवले. त्याच्याच पहिल्या टप्प्यात गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांची आरोग्य चाचणी करण्यात आली. त्यात गुन्हे शाखा सारख्या मुख्य पथकात १० टक्के कर्मचारी अनफिट असल्याचे तर इतर ७ ते ८ टक्के कर्मचारी अनफिट होण्याच्या उंबरठ्यावर असल्याचे समोर आले.