नागपूर - कोरोनामुळे मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत आहे. याला कारणीभूतही बेजबाबदारीने वागणारे नागरिकच असल्याचे दिसून येत आहे. अशाच विना मास्क फिरणाऱ्यांवर नागपूर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. गेल्या ५ दिवसांपासून नागपुरात १७८५ विना मास्क फिरणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने ही कारवाई केली आहे. शिवाय या कारवाईतून तब्बल ३ लाख ५७ हजार इतका दंड वसूल करण्यात आल्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. अशात प्रत्येक नागरिकांनी स्वतःची काळजी घ्या, असे आवाहन प्रशासन व शासनाकडून वारंवार केले जात आहे. मात्र, अनेक शहरांमध्ये नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. नागपुरातही विना मास्क फिरणाऱ्यांना महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. दररोज अनेकांवर ही कारवाई केली जात आहे. शहरात एका दिवसात ६४९ इतक्या बेजबाबदार नागरिकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून १ लाख २९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे महानगरपालिकेकडून सांगण्यात आले आहे. शिवाय गेल्या ५ दिवसात १७८५ इतक्या विना मास्क फिरणाऱ्यांवर मनपाकडून कारवाई करत ३ लाख ५७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच गडद होत आहे. अशावेळी मनपा प्रशासन व महापौरांकडून नागरिकांना वारंवार मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे याबाबत जनजागृती केली जात आहे. मात्र, या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मनपाच्या उपद्रव शोध पथकाकडून ही कारवाई केली जात आहे. त्याचबरोबर पोलिसांकडूनही शहरातील विविध भागात बेजबाबदारीने वागणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याचेही पहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाला आळा घालायचा असेल तर नियमांचे पालन करा, असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.